मुंबईत बालकुपोषणात ८५ टक्के घट
esakal April 06, 2026 10:45 PM

मुंबईत बालकुपोषणात ८५ टक्के घट

आरोग्यसंपन्न उपक्रमाची उल्लेखनीय कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईतील चेंबूर आणि वाशी नाका परिसरातील वंचित वस्त्यांत राबवलेल्या आरोग्यसंपन्न उपक्रमामुळे बालकुपोषणात तब्बल ८५ टक्क्यांची घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६मध्ये एक हजारहून अधिक मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला असून, हा उपक्रम समुदायआधारित पोषण आणि माता आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी ठरला आहे.

निर्मया फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश बालकुपोषण कमी करणे, सार्वजनिक आरोग्यसेवा मजबूत करणे आणि नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. २०२१पासून हा उपक्रम स्थलांतरित लोकसंख्या असलेल्या भागातील एक लाखाहून अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे.

वंचित वस्त्यांत नवजात बालक आणि मातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, चुकीच्या आहार पद्धती आणि जागरूकतेचा अभाव ही कुपोषणाची प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून उपक्रमांतर्गत पालकांसाठी वैयक्तिक समुपदेशन, गट सत्रे, बालकांसाठी ओपीडी सेवा आणि समुदाय आरोग्य ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधून शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.

यंदा सुमारे १० हजार नागरिकांपर्यंत आरोग्य शिबिरे आणि पोषणविषयक उपक्रम पोहोचले आहेत. गर्भवतींना शासकीय योजनांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. टाटा मोटर्स फाउंडेशनचे सीईओ विनोद कुलकर्णी यांनी सांगितले, की स्थानिक समुदायाच्या सहभागातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच असे सकारात्मक बदल शक्य होतात. आरोग्यसंपन्न उपक्रम तळागाळातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी अनुकरणीय मॉडेल ठरत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.