Satana News : अवकाळीच्या जखमेवर तांत्रिक मीठ; ७/१२ पोर्टल ठप्प, शेतकरी हवालदिल!
esakal April 06, 2026 11:45 PM

सटाणा - बागलाण तालुक्यावर अवकाळी पाऊस व गारपिटीने कहर केला असताना, आता तांत्रिक अडचणींचा नवा फेरा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतीक्षेत्र उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले असून, शासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत.

मात्र शासनाचे ऑनलाईन सातबार्याचे संकेतस्थळ गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्याने नुकसानभरपाई व मदतीच्या आशेने धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा आणि ८-अ उताऱ्यांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भूमी अभिलेख विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक बिघाडामुळे वारंवार ठप्प पडत असल्याने संपूर्ण यंत्रणाच विस्कळीत झाली आहे. ५ एप्रिलपर्यंत संकेतस्थळावरील दुरुस्ती पूर्ण होईल, अशी अधिकृत घोषणा असूनही ६ एप्रिल उजाडूनही संकेतस्थळ सुरळीत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप उसळला आहे.

महसूल विभागाने २ एप्रिल मध्यरात्रीपासून ५ एप्रिलपर्यंत संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत दुरुस्ती पूर्ण होऊन सेवा पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आजही संकेतस्थळावर ‘सर्व्हर एरर’ आणि ‘पेज नॉट फाऊंड’चे संदेश दिसत असल्याने ‘दुरुस्तीचा फार्स’च झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

महा ई-सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्या तरी, शेवटी त्यांच्या हाती निराशाच येत आहे.

पंचनामे अडचणीत; मदतीवर प्रश्नचिन्ह

नुकसान भरपाईसाठी सातबारा आणि ८-अ उतारे अत्यावश्यक कागदपत्रे मानली जातात. तलाठी कार्यालयांकडून पंचनाम्यांसाठी ही कागदपत्रे तातडीने मागवली जात आहेत. परंतु ऑनलाईन सेवा ठप्प असल्याने पंचनाम्यांची प्रक्रिया रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.

याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होण्याची शक्यता असून, आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरत आहे.

याशिवाय बँक कर्ज, न्यायालयीन प्रकरणे आणि जमीन खरेदी-विक्री व्यवहार देखील ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे प्रशासनाचा तांत्रिक गोंधळ या दुहेरी संकटात शेतकरी कात्रीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व भूमी अभिलेख विभागाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन युद्धपातळीवर पोर्टल सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा, आधीच संतप्त असलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवकाळी पावसाने आमचं पीक संपवलं, आता सातबारा मिळत नाही म्हणून पंचनामेही अडकलेत. निसर्गाने मारलं ते वेगळं, पण सरकारच्या यंत्रणेकडूनही अशीच निराशा मिळणार असेल तर आम्ही जगायचं कसं? मदतीसाठी धावपळ करतोय, पण हातात काहीच लागत नाही हीच खरी शोकांतिका आहे.'

- मनोहर मोरे, शेतकरी

सातबारा संकेतस्थळ बंद असणं ही शासनाची मोठी चूक आहे. पंचनामे वेळेत झाले नाहीत तर हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहतील. प्रशासनाने तत्काळ संकेतस्थळ सुरू करून पर्यायी व्यवस्था उभी केली नाही, तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

- केशवराव सूर्यवंशी, अध्यक्ष, बागलाण तालुका शेतकरी संघटना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.