मंचर - आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी येथील वनदेव वस्तीमध्ये सोमवारी (ता. ६) दुपारी लागलेल्या भीषण आगीत शेतमजूर राहुल सिताराम खंडागळे यांचा संसार अक्षरशः राख झाला. या आगीत सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून कुटुंबीय बेघर झाले आहेत.
श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी खंडागळे कुटुंबीय गावात गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नसताना अचानक झोपडीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले; मात्र कडक ऊन आणि वाऱ्यामुळे अवघ्या दहा मिनिटांत संपूर्ण झोपडी जळून खाक झाली.
या आगीत झोपडीसह लहान-मोठ्या १२ शेळ्या, धान्यसाठा, तांदूळ, भुईमुगाच्या शेंगांची पोती, शेती फवारणी पंप, शालेय पुस्तके, संसारोपयोगी वस्तू तसेच ६० हजार रुपयांची रोख रक्कम जळून नष्ट झाली. यात्रा व कौटुंबिक कारणासाठी बँकेतून काढून आणलेली ही रक्कमही आगीत भस्मसात झाली.
घटनेनंतर कुटुंबीय घटनास्थळी आल्यानंतर महिलांसह लहान मुलांना रडू कोसळले. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी तत्काळ पुढाकार घेत अर्ध्या तासात ४५ हजार रुपयांची मदत उभी केली.
नुकसानीचा पंचनामा अवसरी बुद्रुक येथील ग्राममहसूल अधिकारी रवींद्र बेंद्रे यांनी केला आहे. तसेच खंडागळे कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांच्याकडे केली आहे.
गेल्या ४० वर्षांपासून राहुल खंडागळे यांचे वास्तव्य गावडेवाडी येथे आहे. खेड तालुक्यातील जऊळके या मूळ गावी घरकुलाचे काम सुरू असून त्यासाठी साहित्य खरेदीसाठी त्यांनी बँकेतून ६० हजार रुपये काढले होते. मात्र, ही संपूर्ण रक्कम आगीत जळून गेल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.