KKR vs PBKS : कोलकाता-पंजाब सामना पावसामुळे रद्द, केकेआरची विजयाची प्रतिक्षा कायम
Tv9 Marathi April 07, 2026 03:45 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 12 वा सामना पावसाने जिंकला आहे. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. दोन्ही संघांचा हा एकूण तिसरा सामना होता. सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र सामन्यात 22 चेंडूचा खेळ झाला. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे पाऊस आणि ओल्या खेळपट्टीच्या युतीमुळे सामना पुन्हा सुरु करण्याची परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.

सामन्यात काय झालं?

कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. अजिंक्य रहाणे याने संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर एकूण 17 मिनिटांत 22 चेंडूचा खेळ झाला. मात्र त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली.त्यामुळे खेळ नाईलाजाने थांबवावा लागला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानाबाहेर धाव घेतली. तर ग्राउंड स्टाफने मैदानात धावत येऊन खेळपट्टी कव्हर केली.

पंजाबने केकेआरला या 22 चेंडूत 2 झटके दिले. केकेआरला 3.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 25 धावा केल्या. त्यानंतर खेळ थांबवण्यात आला. केकेआरसाठी फिन एलन याने 6 तर कॅमरुन ग्रीन याने 4 धावा केल्या. तर कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी ही मुंबईकर जोडी नाबाद परतली. अजिंक्यने 8 आणि अंगकृषने 7 धावा जोडल्या. तर झेव्हीयर बार्टलेट याने दोन्ही विकेट मिळवल्या. त्यानंतर पावणे 8 ते जवळपास सव्वा अकरा अशी एकूण साडे 3 तास पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्यात आली.

पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पंच ठराविक वेळेने खेळपट्टीची पाहणी करत होते. त्यामुळे सर्वांचं लक्ष पंचांच्या निर्णायकडे होतं. चाहत्यांना खेळाला पुन्हा सुरुवात होईल, अशी आशा होती. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही खेळपट्टी खेळण्यासारखी नव्हती. पंचांनी श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही कर्णधारांना परिस्थितीची माहिती दिली. दोन्ही संघांनी हस्तांदोलन केलं. यासह सामना रद्द झाल्याचं स्पष्ट झालं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.