शिरूर - भांबर्डे (ता. शिरूर) येथील विहिरीत महिनाभरापूर्वी ११ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळून आला होता. सतत किरकिर करतो म्हणून आईनेच या चिमुकल्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कपड्याच्या बॅगेत भरून विहिरीत टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.
यश रवींद्र पवार असे खून झालेल्या बाळाचे नाव असून, त्याचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा रवींद्र पवार यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. ६) या खून प्रकरणी अटक केली. भांबर्डे (ता. शिरूर) येथील पवार वस्तीवरील विहिरीत ८ मार्च रोजी बॅगेत यश याचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
दरम्यान, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास केला. त्यात पूजा पवार यांचा जबाब नोंदविताना पोलिसांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले.
त्यावर त्यांनी उलट- सुलट व उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे व रवींद्र पवार यांनीही जबाबात दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी कसून चौकशी केली असता पूजा यांनी चिमुकल्याच्या खुनाची कबूली दिली.
दरम्यान, रवींद्र पवार यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, पवार दांपत्य मुरूड जंजिरा येथे फिरायला गेले होते. तेथून परतल्यानंतर यश हा नेहमी किरकिर करून रडत असल्याची पूजा यांची तक्रार होती. कुठेतरी निघून जाऊन चांगला नवरा बघून दुसरे लग्न करावे, असाही त्यांचा विचार होता.
तथापि, मुलाला सोबत घेऊन गेल्यावर कुणी लग्न करणार नाही, या अविचाराने त्यांनी यश याला मारहाण करून कपडे धुण्याच्या सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह घरातील कपड्यांच्या बॅगेत भरून ती बॅग आपल्याच शेतातील विहिरीत टाकून दिली. बॅग पाण्यात बुडावी यासाठी त्यांनी बॅगेत दगड देखील भरले.