ढिंग टांग : होर्मुझ : काही सोपे तोडगे..!
esakal April 07, 2026 09:45 AM

होर्मुझच्या सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व आता सर्वांनाच माहीत आहे. घरोघर अनेक युद्धतज्ज्ञ जन्मलेले पाहून आमचा बौद्धिक अभिमान शिगेला पोचला आहे. तथापि, बऱ्याच अज्ञ जनांना साधी होर्मुझची सामुद्रधुनी कशाला म्हणतात, हेदेखील माहीत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी कुंभमेळ्यात पेटवीत असावेत, असा समज नाशिकच्या एका गृहस्थांचा झाला होता. कुंभमेळ्यापर्यंत यावर तोडगा निघेल, असे ते छातीठोकपणाने सांगत होते.

मुंबईच्या पारशी कॉलनीतील होर्मुझ बाटलीवाला नामक सज्जन गृहस्थांचे जिणे हराम झाले. अशा अज्ञानाच्या कितीक परी!! परंतु, आमच्यासारखा भूराजकीय परिस्थितींचे साकल्याने विश्लेषण करून जगाला योग्य तो मार्ग दाखवणारा तज्ज्ञ असल्यावर चिंतेचे तसे काही कारण नाही.

होर्मुझच्या सामुद्रधुनी विषयी थोडेसे : इराणच्या आखाताला  ओमानच्या आखाताशी जोडणारी ही एक अरुंद सामुद्रधुनी आहे. हिच्या उत्तरेस  इराण तर दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती आणि ओमान हे देश आहेत. जगातील एकूण खनिज तेल वाहतुकीच्या २० टक्के वाहतूक या सामुद्रधुनीद्वारे जहाजातून होते.

सद्यःस्थितीविषयी थोडेसे : या जलमार्गावर इराणने जागोजागी टोलनाके उभारले असून इस्राईल आणि अमेरिकेने काही टोलनाके खळ्ळ खट्याक धोरण राबवून पाडले. तरीही इराणने होर्मुझचा मार्ग खुला केला नाही. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्या कारणाने बर्वे दहीवडेवाले, प्रभा विश्रांतीगृह, असंख्य मिसळगृहे व खानावळी वगैरे खाद्यगृहे तूर्त बंद आहेत. ग्यासच नाही! अशा परिस्थितीत होर्मुझ खुले व्हावे, यासाठी प्रयत्न चालू आहेत. तोडगा अद्याप निघालेला नसला तरी काळजीचे कारण नाही. आम्ही आहो!!

तोड्ग्यांविषयी थोडेसे : ‘‘होर्मुझ उघडा नाहीतर तिच्या *** ** ***** नरकात पडा!’’ असा दम अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोलांडतात्या ट्रम्प यांनी मारला आहे. डोलांडतात्यांनी वाळवंटातल्या शिव्या ऐकल्या नाहीत. उंटाशी संबंधित असतात. त्या ते ऐकते, तर दम मारला नसता. काहीही असो, शिव्या हा काही दरवेळी तोडगा ठरू शकत नाही.

शिव्यांचा दरवेळी उपयोग होतो असे नाही, तसेच समुद्रमार्गे वाहतूक केलीच पाहिजे असा काही नियम नाही. कधी कधी पेट्रोल बाटलीतूनही न्यावे लागते. पंपवाल्याला मस्का मारला की काम भागते. तसेच काहीसे जागतिक प्रमाणावर करावे लागेल.

तोडगा क्र. १ : होर्मुझमधून जाताना जहाजांना नाके मुठीत धरून जावे लागते. त्याऐवजी ओमानच्या एका किनाऱ्यावर साडेतीन लाख बॅरल तेल उतरवून ते वाळवंटातून दुसऱ्या बाजूच्या किनाऱ्यावर पोहोचवणे सहज शक्य आहे. हे प्याराशूटला पिंपे बांधूनही करता येईल.

तोडगा क्र. २ : भूस्थिर उपग्रहाला लांबलचक दोरी बांधून एका किनाऱ्यावरून जहाजे उचलून दुसऱ्या किनाऱ्यावर ठेवली तरी काम भागेल!!

तोडगा क्र. ३ : होर्मुझची सामुद्रधुनी चिंचोळी आहे. थेट भराव घालावा आणि रस्ता बांधावा. भारतातील रस्तेवाहतूक मंत्रालय रस्तेबांधणीत तरबेज आहे. गोवा हायवे सोडला तर त्यांनी सगळे रस्ते धडाक्यात बांधून काढले आहेत. गोव्याचे प्रकरण नाही म्हटले तरी गुंतागुंतीचेच झाले आहे.

तोडगा क्र. ४ : तेलवाहू जहाजांना बोइंगची इंजिने लावून पर्शियन आखात आले की जहाजांनी हवेत उड्डाण करायचे, आणि अरबी समुद्रात लँड व्हायचे! नाहीतरी विमानांना हवाई जहाज म्हणतातच.

तोडगा क्र. ५ : अमेरिका, इस्राईल आणि इराणच्या नेत्यांना ‘धुरंधर १ व २’ फुकट दाखवावा. चित्रपटानंतर ते आपोआप युद्ध थांबवतील! विषय एण्ड!! भारतात शूर लोक राहतात, हा मेसेज युद्धबिद्ध थांबवायला पुरेसा आहे.

शेवटचा तोडगा : डोलांडतात्यांचे ‘ट्रुथ सोशल’वरील हँडल बंद करावे!!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.