मज्जारज्जूवरचा दाब
esakal April 07, 2026 09:45 AM

नवी शरीर हे निसर्गाची एक अद्भुत आणि गुंतागुंतीची निर्मिती आहे हे आपण नेहमीच अनुभवतो. शरीरातली सुसूत्रता इतकी नेटकी असते, की प्रत्येक सांधा आणि प्रत्येक नस एका लयीत कार्य करत असतात. या सर्व रचनेत पाठीचा कणा हा केवळ आधारस्तंभ नसून, तो संदेशवहनाचा मुख्य महामार्ग आहे हे आपण मागे बघितलं. विशेषतः मानेचा भाग! मेंदूला उर्वरित शरीराशी जोडतो आणि म्हणूनच अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असतो.

गेल्या काही लेखांत आपण स्पाँडिलोसिसच्या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल जाणून घेतले, जी वयानुसार अटळ मानली जाते. मात्र, ही प्रक्रिया मर्यादेबाहेर जाते, तेव्हा शरीर आपल्याला काही संकेत देऊ लागते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे येणाऱ्या संकटाची पावले ओळखूनही डोळे मिटून घेण्यासारखे आहे.

स्पाँडिलोसिसने ग्रासलेल्या बहुतांश व्यक्तींना केवळ मानदुखी किंवा मान आखडण्याचा अनुभव येतो, जो विश्रांतीने किंवा उपचाराने बरा होतो. परंतु, मणक्यातील कॅनॉल हा नैसर्गिकरित्या अरुंद असलेल्यांसाठी ही स्थिती धोक्याची घंटा ठरू शकते. अशा वेळी मानेच्या मज्जारज्जूवर दाब येण्यास सुरुवात होते.

हा मज्जारज्जू म्हणजे मेंदूपासून निघालेली अत्यंत महत्त्वाची ‘केबल’ आहे, जिचा संबंध शरीराच्या प्रत्येक हालचालीशी आणि संवेदनेशी असतो. एका प्रख्यात शास्त्रज्ञाने याला जगातील ‘सर्वांत व्यस्त स्विच बोर्ड’ असे संबोधले आहे. ही केबल केवळ संदेश वाहून नेत नाही, तर तिला स्वतःची एक ‘बुद्धिमत्ता’ असते. शरीरासाठी आवश्यक ते फेरफार स्पायनल कॉर्ड आपसूकच करत असते. हृदय, फुफ्फुसे आणि पोटातील अवयवांच्या कार्यातही या मज्जारज्जूचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो.

मज्जारज्जूला होणाऱ्या इजेचे दाहक स्वरूप आपण प्रसिद्ध ‘सुपरमॅन’ फेम अभिनेता क्रिस्टोफर रीव्ह याच्या उदाहरणावरून पाहू शकतो. १९९५ मध्ये एका घोडेस्वारीच्या स्पर्धेत झालेल्या अपघातात, रीव्हच्या मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि मज्जारज्जूचा प्रवाह खंडित झाला. आधुनिक वैद्यकीय मदतीमुळे तो वाचला असला, तरी उर्वरित आयुष्यात त्याला मानेखालच्या शरीराच्या पूर्ण पॅरॅलिसिसने जखडून ठेवले.

स्पाँडिलोसिसमध्ये हेच नुकसान अगदी हळूहळू, टप्प्याटप्प्याने होत जाते, ज्याला ‘मायलोपथी’ म्हणतात. सुरुवातीला चालताना तोल जाणे, विशेषतः अंधारात चालताना अडखळणे किंवा पाय कापसाच्या गादीवर पडत असल्याचा भास होणे ही लक्षणे दिसतात. पायातील चप्पल नकळत निसटून जाणे किंवा चालताना पाय जड होणे हे मज्जारज्जूवर दाब वाढल्याचे निदर्शक असते.

मानेपासून हा भाग लांब असल्याने अनेकदा या लक्षणांचा उलगडा होत नाही हे आपण मागच्या लेखात पाहिलं. किंबहुना, अशा रुग्णांचा तोल जाताना पाहून लोक ‘चुकीचा’ समज करून घेण्याचीही शक्यता असते. केवळ पायातच नव्हे, तर हातांच्या हालचालीतही क्लिष्टता येते. बोटांनी करायची सूक्ष्म कामेही कमालीची अवघड वाटू लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हाताची पकड (ग्रिप) मात्र बराच काळ टिकून राहते!

मानेची हालचाल करताना शरीरातून विजेचा झटका गेल्यासारखी संवेदना होणे किंवा मुंग्यांची सळसळ मानेपासून थेट पायापर्यंत सर्रकन पोहोचणे हे मायलोपॅथीचे गंभीर लक्षण आहे. ही लक्षणे प्रकट होतात, तेव्हा आजार प्राथमिक अवस्थेत नसतो, तर मज्जारज्जूची ‘दाब सहन करण्याची’ नैसर्गिक क्षमता संपत आल्याचे ते निदर्शक असते.

मज्जारज्जू हा तसा सहनशील असतो; जोपर्यंत दाब शिगेला पोहोचत नाही, तोपर्यंत तो कार्य करत राहतो; पण ही सीमा ओलांडली गेली, की लक्षणे वेगाने बळावतात. वेळीच उपचार झाले नाहीत, तर मज्जारज्जू अधिक खराब होऊन हाताचे स्नायू वाळून जातात आणि पंजा वाकड्या आकाराचा (क्लॉ हँड) होतो. लघवीवरचा ताबा जाण्यापर्यंत मजल जाते. क्रिस्टोफर रीव्हच्या बाबतीत जे एका क्षणात घडले, ते स्पाँडिलोसिसच्या रुग्णांमध्ये अनेक महिन्यांच्या संथ गतीने घडत असते.

स्पाँडिलोसिसच्या आजारात मानेच्या मज्जारज्जूवर स्पॉडिलोसिसमध्ये तयार झालेल्या हाडांच्या चोचीमुळे (ऑस्टिओफाइट) दाब येतो. या दाबामुळे मज्जारज्जूचा रक्तपुरवठा कमी होतो. मानेच्या वारंवार हलचालींमुळे स्पायनल कॉर्ड परत परत चेमटली जाते. या गोष्टींमुळे इजा बळावत जाते.

दुसरीकडे, कधीकधी संपूर्ण मज्जारज्जूवर दाब न येता केवळ तिथून निघणाऱ्या विशिष्ट नसेवर दाब (सर्व्हायकल रॅडिक्युलोपथी) येतो. यात मानेपासून सुरू होणारी कळ खांद्यातून थेट हातापर्यंत पोहोचते. अनेकदा चुकीच्या पद्धतीने झोपल्याने किंवा मान अवघडल्याने ही लक्षणे अचानक उद्भवतात. मणक्याच्या शस्त्रक्रिया १९५०च्या दशकापासून अधिक प्रगत झाल्या. डॉ. स्मिथ, डॉ. रोबिन्सन आणि डॉ. क्लॉवर्ड यांसारख्या तज्ज्ञांनी मणक्यावर पुढच्या बाजूने शस्त्रक्रिया करण्याची तंत्रे विकसित केली, ज्यामुळे रुग्णांना पुन्हा सामान्य जीवन जगणे शक्य झाले.

मात्र, शस्त्रक्रिया किंवा आधुनिक तंत्रज्ञानापेक्षाही महत्त्वाचे आहे ते म्हणजे रुग्णांची स्वतःच्या शरीराप्रतीची सजगता. अनेकदा रुग्ण व्हीलचेअरवरून हॉस्पिटलमध्ये येतात, तेव्हा असे लक्षात येते, की ही लक्षणे कित्येक महिन्यांपासून दिसत होती; पण त्यांचा गांभीर्याने विचार केला गेला नाही. लक्षणे ओळखणे आणि त्यांचा योग्य अन्वयार्थ लावणे हीच आरोग्याच्या दिशेने जाणारी पहिली पायरी आहे.

शरीराच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहणे आणि वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच प्रगल्भ रुग्णाचे लक्षण आहे. जीवनाच्या प्रवासात मणक्याचे आरोग्य जपणे म्हणूनच, शरीराने दिलेल्या प्रत्येक लहानशा खुणेची ओळख करून घेऊन तिचा मान राखावा हे उत्तम.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.