आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
मंगेश भांडेकर April 07, 2026 07:13 PM

गडचिरोली : आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्हा आज नव्या सकारात्मक बदलाचा साक्षीदार ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथील आदिवासी (Trible) बांधव आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांऐवजी पुजाऱ्यांकडे जात होते. मात्र, आता हा प्रकार रोखण्यासाठी गडचिरोली आरोग्य विभागाने एक अनोखी आणि प्रभावी उपाययोजना सुरू केली आहे. पुजाऱ्यांनाच आरोग्यदूत बनवून आदिवासी बांधवांना डॉक्टरांकडे पाठवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठी पुजाऱ्यांना (Pujari) मानधनही दिलं जाणार आहे.  

गडचिरोली हा आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा जिल्हा. येथील सुमारे 30 ते 40 टक्के आदिवासी बांधव आजही आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांऐवजी पारंपरिक पद्धतींवर विश्वास ठेवतात, ते पुजारी, बाबा, महाराजांना जवळ करतात. त्यामुळेच, जिल्ह्यात विशेषतः मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आणि मृत्यूदरही चिंताजनक ठरला. काही दिवसांपूर्वीच एका गर्भवती मातेने डॉक्टरकडे न जाता पुजाऱ्याकडे जाऊन उपचार केल्याने तिचा आणि बाळाचा मृत्यू झाला होता. मात्र, आता या समस्येवर आरोग्य विभागाने एक नवी शक्कल लढवली आहे. गावातील पुजाऱ्यांनाच प्रशासनाने आरोग्यदूत बनवले असून जे पुजारी पूर्वी पारंपरिक उपचार करायला सांगायचे, तेच पुजारी आता रुग्णांचे मतपरिवर्तन करुन तात्काळ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देत आहेत.

पुजाऱ्यांना मिळणार 15 रुपये मानधन

जिल्ह्यातील जवळपास 1700 पुजाऱ्यांची यादी आरोग्य विभागाने तयार केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर एटापल्ली आणि भामरागड या दोन तालुक्यात हा प्रयोग राबवला जात आहे. पुजाऱ्यांना आरोग्यविषयक प्राथमिक प्रशिक्षणही दिले जात असून पुजाऱ्यांना प्रती रुग्ण 15 रुपये मानधनही दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागात आरोग्याबाबत जागरूकता वाढून मलेरियासारख्या आजारांवर वेळेत उपचार मिळेल आणि मृत्यूदर कमी करण्यास मोठी मदत होईल, अशी माहिती गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, नक्कीच, गडचिरोलीतील हा प्रयोग राज्यासाठीच नाही तर देशासाठी एक आदर्श ठरू शकतो. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक वैद्यक यामध्ये समन्वय साधत गडचिरोली आरोग्य विभागाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.

नॅशनल पार्कच्या खालून तीन लेन रस्ता; 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कसा आहे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.