युद्धविराम यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा इस्रायलींना आवर घातलाच पाहिजे; तडकाफडकी राजीनामा दिलेल्या ट्रम्पच्या शिलेदाराचा थेट इशारा
अंकिता खाणे April 08, 2026 01:13 PM

Iran-US Ceasefire: इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरच्या संचालकपदाचा राजीनामा दिलेल्या जो केंट यांनी युद्धविरामाबाबत (Iran-US Ceasefire) महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा सीजफायर यशस्वी करायचा असेल तर सर्वप्रथम इस्रायलने संयम राखणे अत्यावश्यक आहे. फक्त युद्धविराम जाहीर करणे पुरेसे नसून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नमूद केले आहे. कोणत्याही बाजूकडून हल्ले सुरूच राहिले तर हा हा करार कमकुवत ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.(Iran-US Ceasefire)

joe kent : लष्करी कारवायांवर नियंत्रण ठेवले तरच संवादाची प्रक्रिया पुढे जाऊ शकते 

जो केंट यांच्या वक्तव्यावरून सध्याच्या परिस्थितीत इस्रायलची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट होते. इस्रायलने आपल्या लष्करी कारवायांवर नियंत्रण ठेवले तरच संवादाची प्रक्रिया पुढे जाऊ शकते आणि तणाव कमी होण्याची शक्यता वाढू शकते. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविराम लागू करण्यात आलेला असतानाच जो केंट यांचा हा व्हिडीओ समोर आला असून, आता दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.(Iran-US Ceasefire)

दरम्यान, अमेरिका-इराण संघर्षाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी झाली, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक नेत्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत मिडल ईस्टमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. बहरीन, कुवैत आणि दुबई येथेही तणाव निर्माण झाला.

या युद्धामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. स्ट्रेट ऑफ होर्मुज हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. जगातील सुमारे २० टक्के तेल या मार्गाने वाहतूक होते, त्यामुळे त्याच्या बंदीचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाल्याचे दिसून आले.(Iran-US Ceasefire)

जो केंट यांच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर करण्यात येणारा नियोजित लष्करी हल्ला तूर्तास दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलला आहे. ट्रम्प यांनी केवळ हल्ला टाळला नाही, तर दोन्ही बाजूंनी युद्धविराम करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये अमेरिकेने दिलेली हल्ल्याची धमकी मागे घेणे आणि बदल्यात इराणने त्यांच्या आक्रमक हालचाली थांबवणे, अशा अटींचा समावेश असल्याचे केंट यांनी सूचित केले आहे.केंट यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांना थेट युद्ध नको आहे. त्यांनी इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी हा वेळ दिला आहे. पुढील दोन आठवडे हे अत्यंत कळीचे असून, या काळात इराणकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता पाहता, ट्रम्प यांनी हा व्यावहारिक निर्णय घेतल्याचे केन यांनी नमूद केले आहे. युद्ध सुरू झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला आहे. जो केंट यांच्या मते, हा निर्णय म्हणजे अमेरिकेची माघार नसून ती एक रणनीती आहे. ट्रम्प यांनी आधी आपली ताकद दाखवून दिली आणि आता शांततेसाठी एक संधी दिली आहे. जर या दोन आठवड्यात तोडगा निघाला नाही, तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचे केंट यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकन प्रशासनातील काही गटांनी घाईने युद्धात उतरण्याला विरोध केला होता. केंट यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, अनावश्यक युद्ध टाळून अमेरिकन हिताचे रक्षण करणे हे ट्रम्प यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

लेबनॉनवरील कारवाई सुरूच ठेवण्याबाबत नेतान्याहूंचे वक्तव्य; अमेरिका-इराण युद्धविरामासाठी ठरू शकते ‘अडथळा’

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेले एक वक्तव्य अमेरिका-इराणदरम्यान झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामासाठी संभाव्य अडथळा ठरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या युद्धविराम करारात लेबनॉनचा समावेश नाही. नेतान्याहू यांनी त्यांच्या निवेदनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धविराम घडवून आणल्याबद्दल समर्थन केले. मात्र, त्यांनी यासोबतच दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीनेही ट्रम्प यांना पाठिंबा देणार असल्याचे नमूद केले. विशेषतः इराणकडून क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचा धोका पूर्णपणे संपवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या निवेदनातील शेवटच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिका-इराण युद्धविरामाचा लेबनॉनमधील इस्रायलच्या कारवायांवर कोणताही परिणाम होणार नाही. हा मुद्दा इस्रायलसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या इस्रायल दक्षिण लेबनॉनमध्ये आपली लष्करी उपस्थिती वाढवत असून, हिज्बुल्लाहविरोधात बफर झोन निर्माण करण्यासाठी कारवाया तीव्र केल्या आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, इस्रायलसाठी लेबनॉनमधील संघर्ष हा इराणसोबतच्या संघर्षाइतकाच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.