Iran War Live Update: अमेरिका आणि इराण दरम्यान झालेली दोन आठवड्यांची तात्पुरती युद्धबंदी (Ceasefire) ही पश्चिम आशियात राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे. इराणला अश्मयुगात नेण्यापूर्वीच ट्रम्प यांना अमेरिकेत जगभरातून दबाव वाढल्यानंतर तसेच इराणी निर्भिडपणे मानवी साखळ्या करत दाखवलेल्या निर्धाराने पलटी मारावी लागली. इराणकडून 10 अटी घालण्यात आल्यानंतर त्या चर्चायोग्य असल्याचे सांगत दोन आठवड्यांची शस्त्रसंधी केली. यामध्ये पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तने पुढाकार घेतला. मात्र, या निर्णयामुळे युद्धखोर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची खरोखरच मोठी राजकीय आणि लष्करी कोंडी झाली आहे. निष्पाप लोकांची गाझापट्टी साफ केल्यानंतर लेबनाॅनमध्येही तेच करत सुटलेल्या आणि आपल्याविरोधात खटले दडपून टाकण्यात बिझी असलेल्या नेत्यानाहू यांचं काय करायचं असा प्रश्नही अमेरिकेसमोर असेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणसोबत ही युद्धबंदी केली. इराणचे म्हणणे आहे की ही युद्धबंदी सर्व आघाड्यांवर लागू आहे, परंतु नेत्यानाहू यांनी स्पष्ट केले आहे की ही युद्धबंदी लेबनॉनला लागू नाही. त्यामुळे या मुद्यावर इस्त्रायल आणि युद्धखोर नेत्यानाहूंना साजेशी आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास शांततेसाठी मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. दुसरीकडे, इस्रायलमधील विरोधी पक्षनेते याइर लॅपिड यांनी नेत्यानाहू यांच्यावर "राजकीय अपयश" असल्याची टीका केली आहे. अमेरिकेने इस्रायलला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याने नेत्यानाहू यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नेत्यानाहू यांना इराणच्या अणुकेंद्र प्रकल्पांना कायमचे नष्ट करायचे होते, परंतु या युद्धबंदीमुळे त्यांना आता आपले पाऊल मागे घ्यावे लागले आहे.
दुसरीकडे, भारताने या युद्धबंदीचे स्वागत केले असून, ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या "अश्मयुगात नेण्याच्या" धमकीनंतर हा घेतलेला 'यू-टर्न' असल्याचे म्हटले आहे. Al Jazeera ने नेत्यानाहू यांच्या कार्यालयातील अधिकृत विधानाचा दाखला दिला आहे, ज्यात त्यांनी "ही युद्धबंदी केवळ इराणसाठी आहे, लेबनॉनसाठी नाही" असे म्हटले आहे. दुसरीकडे, The Jerusalem Post या इस्रायली वृत्तपत्राने नेत्यानाहू यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा 'लेबनॉनचा दावा' फेटाळल्याचे वृत्त दिले आहे.
युद्धखोर इस्त्रायलच्या नरसंहारामुळे लेबनॉनची स्थिती भयावह आहे. नेत्यानाहू यांनी इराणसोबत युद्धबंदी असली तरी, इस्रायली सैन्य (IDF) लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह विरुद्धचे 'ग्राउंड ऑपरेशन' आणि हवाई हल्ले सुरूच ठेवेल, असा आदेश दिला आहे. आज 8 एप्रिल रोजी सकाळीही दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने हल्ले केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे हल्ले सुरु राहिल्यास इराण कोणती भूमिका घेणार? असाही सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, अमेरिका आणि फ्रान्स लेबनॉनसाठी एका स्वतंत्र युद्धबंदी प्रस्तावावर काम करत आहेत. जर हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तर सीमेवरून मागे जाण्याचे मान्य केले, तरच तिथे युद्ध थांबू शकते. मात्र, नेत्यानाहू सध्या आपल्या देशातील उजव्या विचारसरणीच्या मंत्र्यांच्या दबावाखाली असल्याने ते लेबनॉनमध्ये युद्ध सुरू ठेवण्यावर ठाम दिसतात. मात्र, इराण ते होऊ देणार नाही, हे सुद्धा निश्चित आहे. त्यामुळे नेत्यानाहू यांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या