RBI रेपो रेट प्रभाव: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एप्रिल 2026 च्या चलनविषयक धोरण बैठकीत रेपो दर (Repo Rate) 5.25 टक्क्यांवर कायम ठेवत ‘न्यूट्रल’ भूमिका जाहीर केली. जागतिक अनिश्चितता, विशेषतः पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या ऊर्जा किमतींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आरबीआयने (RBI) स्पष्ट केले की, “महागाई सध्या नियंत्रणात असली तरी ऊर्जा किमती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे पुढील काळात जोखीम वाढण्याची शक्यता आहे.” त्यामुळे व्याजदरात (Interest Rate) बदल करण्याऐवजी परिस्थितीचा बारकाईने आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इनक्रेड मनीच्या विश्लेषणानुसार, हा निर्णय ग्राहकांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारा आहे. “मागील दरकपातीचा परिणाम अद्याप कर्जदरांमध्ये दिसून येत असून, सध्याच्या स्थितीत कर्जदारांवर अतिरिक्त व्याजाचा भार पडणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच, “सध्याची परिस्थिती ही मागणीपेक्षा पुरवठ्याशी संबंधित (सप्लाय शॉक) असल्याने व्याजदर कमी करून त्यावर परिणाम होणार नाही,” असेही इनक्रेड मनीने स्पष्ट केले आहे. इन्फोमेरिक्स रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी सांगितले की, “स्थिर व्याजदरामुळे गृहकर्ज, शिक्षण कर्ज आणि ग्राहक कर्जांसारख्या क्षेत्रांना महत्त्वाचा आधार मिळतो.” ते पुढे म्हणाले, “व्याजदरातील स्थैर्यामुळे घरगुती खर्च आणि गुंतवणुकीचे निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येतात, जे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक आहे.” इंडियाफर्स्ट लाइफच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी डॉ. पूनम टंडन यांनी म्हटले की, “दर स्थिर ठेवण्याचा निर्णय अपेक्षेप्रमाणे असून, वाढत्या महागाईच्या जोखमींच्या पार्श्वभूमीवर आरबीआय भविष्यात डेटा-आधारित निर्णय घेईल. ही भूमिका अर्थव्यवस्थेच्या वाढीस पूरक असून, इक्विटी आणि बाँड बाजारासाठी सकारात्मक संकेत देते.”
इनक्रेड मनीने इशारा दिला की, “शहरी ग्राहकांच्या महागाईच्या अपेक्षा 8.5 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत, तर सध्याचा महागाई दर सुमारे3.2 टक्के आहे,” यावरून भविष्यातील किंमतवाढीबाबतची चिंता स्पष्ट होते. ग्रामीण भागातही महागाईचा अनुभव अधिक तीव्र असल्याचे दिसून येते. “अन्न व इंधनाच्या किमतींमुळे ग्रामीण ग्राहकांना प्रत्यक्षात अधिक महागाई जाणवत आहे,” असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता
आरबीआयच्या अंदाजानुसार, 2026-27 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ 6.9 टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे. ऊर्जा किमतींतील वाढ आणि पुरवठा साखळीतील अडचणी यामुळे वाढीवर काही प्रमाणात दबाव येऊ शकतो; मात्र देशांतर्गत मागणी मजबूत असल्याने अर्थव्यवस्था स्थिर राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
एकूणच, आरबीआयचा हा निर्णय ग्राहकांसाठी स्थैर्य आणि दिलासा देणारा असला, तरी महागाई आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात आव्हाने कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी खर्च आणि गुंतवणूक निर्णय घेताना सावध आणि सजग राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा