DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले
esakal April 09, 2026 03:45 AM

Delhi Capital vs Gujarat Titans Marathi Cricket Updates: गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रोमहर्षक झाला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात GT च्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC ला पथूम निसंका व लोकेश राहुल ( KL Rahul Missed Century) यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. राशीद खानने मधल्या षटकांत तीन विकेट्स घेऊन गुजरातला सामन्यात पुनरागमन करून दिले. पण, राहुल मैदानावर उभा होता आणि शतकाच्या समीप मोहम्मद सिराजने त्याची विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. पण, डेव्हिड मिलर ( David Miller) मैदानावर उभा राहिला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेली. पाचव्या चेंडूवर एक धाव घेण्याचा मिलरचा निर्णय चुकला अन् गुजरातने १ धावेने मॅच जिंकली

शुभमन गिल, जॉस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी खेळी करून गुजरातला ४ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले. साई सुदर्शन १२ धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन व जॉस बटलर यांनी आक्रमक फटकेबाजी करून ३२ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदर व गिल यांनी त्यानंतर ६१ चेंडूंत १०४ धावा जोडल्या. बटलर २७ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांनी ५२ धावांची खेळी केली. गिलनेही ४५ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७० धावा कुटल्या. सुंदरने ३२ चेंडूंत ५५ धावांची खेळी करताना ६ चौकार व २ षटकार खेचले.

गुजरातने पॉवर प्लेमध्ये ११.३३ च्या सरासरीने धावा कुटल्या, परंतु ७ ते १५ ( १०.३३) आणि १६ ते २० ( ९.८) षटकांत त्यांची सरासरी घसरली. दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. गुजरातने दुसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर २०० हून अधिक धावा केल्या आहेत. मागच्या वर्षी त्यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४ बाद २०९ धावा केल्या आणि वैभव सूर्यवंशीच्या शतकामुळे त्यांची हार झाली होती. दिल्लीसाठी लोकेश राहुल व पथूम निसंका यांनी आक्रमक सुरुवात करताना ८.१ षटकांत ७६ धावा फलकावर चढवल्या.

पण, प्रसिद्ध कृष्णाने ही जोडी तोडली आणि निसंका २४ चेंडूंत ४१ धावांवर झेलबाद झाला. त्याने ६ चौकार व १ षटकार खेचला होता. त्यानंतर राशीद खानने सलग दोन विकेट्स घेत दिल्लीला बॅकफूटवर फेकले. नितीश राणा ( ५) व समीर रिझवी ( ०) हे स्वस्तात माघारी परतले. राशीदने ट्वेंटी-२०त ७०७ विकेट्स घेतल्या आहेत आणि तो सध्या सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. दिल्लीसाठी राहुल मैदानावर उभा राहिला आणि शेवटच्या ५ षटकांत ६९ धावांची गरज असताना त्याच्यावर सर्व भीस्त होती. KL Rahul शतकाच्या दिशेने कूच करत असताना त्याच्यासमोर संघाला विजय मिळवून देण्याचे ध्येय होते.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

मात्र, त्रिस्तान स्तब्स ( ७) रन आऊट झाल्याने दिल्लीवरील दडपण वाढत चाललेले. रिटायर्ड हर्ट झालेला डेव्हिड मिलर पुन्हा फलंदाजीला आला. मोहम्मद सिराजने टाकलेल्या १७व्या षटकात सामन्याला कलाटणी मिळाली. स्तब्स रन आऊट झाला आणि नंतर शेवटच्या चेंडूवर राहुल झेलबाद झाला. बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि बॅटची किनार लागत चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. राहुल ५२ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला. दिल्लीला अजून १८ चेंडूंत ४५ धावा हव्या होत्या.

डेव्हिड मिलर उभा राहिला आणि त्याने विपराज निगमसह १४ चेंडूंत ३६ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर दोघांनी २३ धावा कुटल्या. पण, तरीही सामना अटीतटीचा झाला. ६ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विपराज चौकार मारून बाद झाला आणि त्यानंतर ३ चेंडू ८ धावा असा सामना आणला. मिलरने षटकार खेचला खरा, परंतु २ चेंडू २ धावा हव्या असताना मिलरने एक धाव नाकारली. त्यामुळे १ चेंडू २ धावा अशी मॅच आली. प्रसिद्धने चतुराईने चेंडू टाकला आणि मिलरने तो मिस केला.. तितक्याच यष्टिरक्षक जॉस बटलरने थ्रो करून कुलदीपला रन आऊट केले आणि मॅच जिंकली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.