बाळासाहेब काळे
करमाड : पेट्रोल पंपावर काम करून आपल्या दोन मुलांची उपजीविका चालविणाऱ्या महिलेची तिच्याच पतीने पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने गळा चिरून जागीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना छत्रपती संभाजीनगर–जालना मार्गावरील करमाड शिवारातील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर गुरुवारी (ता. ९) दुपारी साडेबारा वाजता घडली.पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु. करमाड, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी सत्यम रावसाहेब गावंडे (वय २८, रा. चित्तेपिंपळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे पतीचे नाव आहे.
पूजा गावंडे या गेल्या दीड महिन्यापासून जालना मार्गावरील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर नोकरी करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी (ता. ९) सकाळी साडेनऊ वाजता कामावर आल्या होत्या. दुपारी सुमारे १२.३० वाजता त्यांचा पती दुचाकीवरून पंपावर आला. पेट्रोल पंपाच्या स्टँडजवळ दुचाकी उभी करून त्याने पूजाला पकडले.
यावेळी पूजा यांनी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचा गळा पकडून पाठीमागून चाकूने वार केला. त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. त्यानंतर आरोपीने धारदार चाकूने तिचा गळा चिरून निर्दयपणे हत्या केली.घटनास्थळी आवाज ऐकून पेट्रोल पंप मालकाचे भाऊ बबनराव मुळे यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांना चाकूचा धाक दाखवून पळ काढला. त्यानंतर तो दुचाकीवरून फरार झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रेकी करून गर्दी नसताना शांतपणे केला खून
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सत्यम याने सकाळीच पंपावर येऊन परिस्थितीची पाहणी (रेकी) केली होती. त्या वेळी पंपावर गर्दी असल्याने त्याला संधी मिळाली नाही. दुपारी साडेबारा वाजता गर्दी कमी झाल्याचे पाहून त्याने नियोजनबद्ध पद्धतीने पूजावर हल्ला केला. काही क्षणांतच वार करून तिला खाली पाडले आणि शांतपणे गळा चिरून हत्या केली.
जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी मृत घोषित केले
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील पूजाला ॲम्ब्युलन्सद्वारे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
पहिल्या पतीची आत्महत्या; २०२५ मध्ये दुसरा विवाह
पूजाचा पहिला विवाह २०१७ मध्ये सुदाम परसराम गावंडे यांच्यासोबत झाला होता. घरगुती कारणांमुळे त्यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजाने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सत्यम गावंडे याच्यासोबत पुणे येथील आळंदी येथे आर्य समाजात विवाह केला होता.पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. लग्नानंतर काही काळ ती कुंभेफळ येथे राहत होती. मात्र पतीसोबत वाद झाल्याने ती काही दिवसांपूर्वी करमाड येथे राहण्यासाठी आली होती.
घटनेनंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, उपनिरीक्षक दिलीप चौरे, भारत निकाळजे, जमादार विजयसिंह जारवाल, प्रशांत नांदवे यांच्यासह फिंगरप्रिंट पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.
आरोपीला दोन ते तीन तासांत अटक
घटना घडल्यानंतर आरोपी सत्यम फरार झाला होता. तो पिंपरीराजा मार्गे कचनेरकडे पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर करमाड पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. पोलिस कर्मचारी दादासाहेब ढवळे व सोपान डकले यांनी पाठलाग करून कचनेर शिवारातील एका शेतातून आरोपीला अटक केली.
मैत्रिणीचा टाहो; पोलिसांकडे आधीच तक्रार
घटनेची माहिती मिळताच पूजाची मैत्रीण छाया गोरखवांगे हिने घटनास्थळी टाहो फोडला. तिने सांगितले की, पूजाने तीन महिन्यांपूर्वी करमाड पोलिस ठाण्यात सत्यमविरोधात तक्रार दिली होती. तसेच मंगळवारी (ता. ७) ती पुन्हा तक्रार देण्यासाठी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात होती.त्यावेळी योग्य कारवाई झाली असती तर पूजाचा जीव वाचला असता, अशी हळहळ व्यक्त करत आज ती माझ्या वाढदिवसाला येणार होती, असे सांगत तिने दुःख व्यक्त केले.