14 एप्रिल रोजी युनिक ग्रीन कॉरिडॉरचे उद्घाटन
Marathi April 10, 2026 11:25 AM

210 किमी लांब दिल्ली-देहरादून द्रूतगती मार्ग

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दिल्ली-देहरादून या 210 किलोमीटर लांब आणि तीन राज्यांमधून जाणाऱ्या द्रूतगती मार्गाचा 20 किलोमीटरचा हिस्सा राजाजी व्याघ्र प्रकल्पामधून जातो. हा हिस्सा पूर्णपणे बदलण्यात आला आहे. मार्गावरील मोहंड खोऱ्यात एलिवेटेड कॉरिडॉर निर्माण केला असून त्यावरून वाहने 100 किलो प्रतितासाच्या वेगाने धावू शकतात आणि त्याखालून प्राण्यांना पलिकडे जाऊ देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली. 20 किमी लांब हिस्स्यात एलिवेटेड भाग 12 किमीचा असून हा ग्रीन कॉरिडॉर पर्यावरण संरक्षण आणि विकासादरम्यान संतुलनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरतोय. या मार्गाचे उद्घाटन 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. मोहंडी खोऱ्यातील बरसाती नदीचे पात्र आता एलिवेटेड मार्गाखालून वाहणार आहे. रस्त्याला 35-40 फूट उंचीवर 400 हून अधिक पिलर्सवर उभारण्यात आले आहे, जेणेकरून नदीचा प्रवाह, प्राण्यांचा कळप आणि विकास तिन्ही गोष्टी विनाअडथळा सुरू रहावा.

आशियाचा सर्वात लांब वाइल्डलाइफ कॉरिडॉर

14 हजार कोटी रुपयांच्या निधीतून निर्मित या द्रुतगती मार्गाचा 12 किमीचा हिस्सा आशियाचा सर्वात लांब वाइल्डलाइफ एलिवेटेड कॉरिडॉर असल्याचे राजाजी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक कोको रोसे यांनी सांगितले आहे. वन्यप्राणी या एलिवेटेड कॉरिडॉर खालून भयमुक्त संचार करू शकतात, तर त्यावरून भरधाव वाहने धावू शकतात.

काय बदलणार?

जलद प्रवास, खर्च कमी : 6-7 तासांचा प्रवास आता 2.5-3 तासांत. अंतर 260 किमीवरून 210 किमी होणार.

सुरक्षा वाढणार : 20 किमीचा जोखिमयुक्त पर्वतीय मार्ग आता 12 किमी एलिवेटेड, दुर्घटनेची जोखीम झाली कमी.

प्रदूषण घटणार : या द्रुतगती मार्गामुळे वर्षाकाठी 93 लाख किलो कार्बन उत्सर्जन घटणार.

पर्यटनाला चालना : हरिद्वार-ऋषिकेश-देहरादूनचा प्रवास सुलभ, पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळणार.

शहरांना लाभ : बागपत, शामली, सहारनपूर यासारख्या शहरांमध्ये द्रुतगती मार्गावर नवी विकासकेंद्रे निर्माण होण्यास मदत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.