आपल्यापैकी अनेक जण गरजेच्यावेळी कोणाकडून तरी पैसे उधार घेतात, पण कधीकधी ते परत करणे राहून जाते. अशा वेळी, जर कर्ज न फेडताच मृत्यू झाला तर काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या प्रश्नावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिले आहे. ते उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
प्रेमानंद महाराजांच्या मते, हा केवळ पैशांचा व्यवहार नसून तो थेट आपल्या पुनर्जन्माशी जोडलेला आहे. प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारले की, "महाराज, जर कर्ज न फेडता आपला मृत्यू झाला, तर ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो का?" यावर महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत कर्माचे सिद्धांत समजावून सांगितले.
महाराज म्हणाले की, जर आपण कोणाचे काही देणे लागतो आणि तो हिशोब या जन्मात पूर्ण झाला नाही, तर निसर्गाच्या नियमानुसार तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यावेच लागते. कर्माचे हे चक्र अतिशय सूक्ष्म आणि अटळ असते.
त्यामुळे जीवनात शक्य तितक्या लवकर कोणाचेही देणे किंवा उसने घेतलेले पैसे परत केले पाहिजेत. डोक्यावर कर्जाचा भार घेऊन मरणे म्हणजे पुन्हा जन्म घेण्याचे आमंत्रण देणे होय. तसेच पैसे देणाऱ्यालाही महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.
जर समोरची व्यक्ती पैसे देऊ शकत नसेल, तर त्याला मनापासून माफ करा. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता, तेव्हा त्या कर्जाचा हिशोब तिथेच संपतो आणि दोन्ही व्यक्ती त्या बंधनातून मुक्त होतात, असे महाराज म्हणाले.
आपण कोणाला तरी दुखावले आहे किंवा कोणाचे पैसे थकवले आहेत आणि आता ते परत करणे शक्य नसेल, तर देवाची मनापासून माफी मागा. ती व्यक्ती तुमचे ऐको न ऐको, पण देव तुमचे नक्कीच ऐकतो, असेही प्रेमानंद महाराजांनी सांगितले.
महाराजांच्या मते, जोपर्यंत मानवाचा कोणाशीही कसलाही हिशोब शिल्लक असतो, तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही. जेव्हा आपण सर्व स्वार्थातून आणि ऋणातून मुक्त होतो.
तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने देवाच्या चरणी स्थान मिळवू शकतो. त्यामुळे या जन्मातील हिशोब याच जन्मात चुकता करण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा प्रेमानंद महाराजांनी दिला आहे.