Sanjay Gaikwad on Vijayraj Shinde : बुलढाण्यात आजी आणि माजी आमदारात चांगलाच वाद पेटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर व टोकाचे आरोप केले आहेत. संजय गायकवाड यांनी आदिवासी व मागासवर्गीय मुली आणि महिलांचा अवमान केला आहे. त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा 100 कोटींचा दावा करणार असल्याचा इशारा विजयाराज शिंदे यांनी दिला आहे. तर माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. मी माफी मागणार नाही अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे.
बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड व बुलढाण्याचे माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. काल आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण करत अनेक मुलींच आयुष्य बर्बाद केल्याचे आरोप केले होते. यावर आज विजयराज शिंदे यांनी उत्तर देताना म्हटलं की, आमदार संजय गायकवाड यांनी माझाच नाही तर आदिवासी व मागासवर्गीय महिला व मुलींचा अवमान केला आहे. त्यांनी आदिवासींसह माझीही माफी मागितली पाहिजे. नाहीतर मी त्यांच्यावर 100 कोटी रुपयांचा दावा टाकणार असल्याचे शिंदे म्हणाले. यावर संजय गायकवाड म्हणाले की, विजयराज शिंदे यांनी अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत, तर एका अल्पवयीन मुलीचा अवैध गर्भपातही केला आहे. या सर्व बाबींचे माझ्याकडे पुरावे आहेत असे गायकवाड म्हणाले. यात शासकीय अहवाल सुद्धा आहे.
जर कुणी शासनाचा मंत्री, पोलीस अधिकारी यांनी विजयराज शिंदे यांना वाचवायचा प्रयत्न केला तर मी त्यालाही सोडणार नाही असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळं मी माफीही मागणार नाही. महायुतीतील मित्र पक्षाचे असलेले हे आजी आणि माजी आमदारांमध्ये आता राजकीय वातानंतर वैयक्तिक वादावादीत सुरुवात झाली आहे. दोघांनीही आता टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे.