संपूर्ण देशात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे. राजकीय पक्ष जोरदार प्रचार करण्यात व्यस्त आहेत. अशातच आता भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आणि आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीरनामा सादर करताना, हा जाहीरनामा राज्यातील प्रत्येक घटकाला नवी आशा देणारा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत आहे अशी माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी महिलांसाठी मोठी घोषणाही केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महिलांसाठी दरमहा 3000 रुपयांची मदत दिली जाणारपश्चिम बंगालमधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. बंगालमध्ये सत्ता आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा 3000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाईल, असं आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. हा निर्णय विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. याशिवाय महिलांची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता वाढवण्यावरही भर देण्यात येईल असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयुष्मान भारत आणि आरोग्य सेवांवर भरभाजपने आपल्या जाहीरनाम्यात आरोग्य सेवांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आयुष्मान भारत योजनेचा चांगला विस्तार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना अधिक चांगल्या उपचारांची सुविधा मिळणार आहेत. महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणीची सुविधा देण्याचीही घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. यामुळे आजाराचे लवकर निदान होऊन उपचार सोपे आणि कमी खर्चिक होतील आणि तसेच लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जनता भाजपला संधी देईल, अमित शहांना विश्वासभाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना अमित शाह यांनी म्हटले की, ‘भाजपचा जाहीरनामा हा केवळ आश्वासनांचा पाऊस नसून बंगालच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा आहे. यावेळी जनता भाजपला संधी देईल आणि राज्याला नवी दिशा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.’