म्हाडा वर्षभरात 13012 घरं बांधणार, मुंबईत 2538 घरांची निर्मिती करणार, म्हाडाचा मेगाप्लॅन तयार
Marathi April 10, 2026 11:25 PM

म्हाडा मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन 2026-2027 च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 13012 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी 10585.12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

म्हाडाचा सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता सुधारित व सन 2026-27 चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन 2025-2026 या वित्तीय वर्षाकरिता 12399.22 कोटी रुपयांच्या सुधारित व सन 2026-27 च्या 17430.73 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

म्हाडा मुंबईत 2538 घरं बांधणार

म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात विविध उत्पन्न गटातील 2538 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी 6747.42 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोकण मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील 5112 सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट आहे. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी 1497.64 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील 665 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट आहे. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी 664.00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नागपूर मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील 2008 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी 1206.19 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील 1483 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी 258.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिक मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील 237 सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी 151.57 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावती मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील 969 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी 59.98 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आमदार निधी /शासन निधीतुन करण्यात येणा-या कामांसाठी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात 2711.95 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाअंतर्गत उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी तसेच पीएमजीपी, संक्रमण गाळे व पुनर्रचित इमारतींच्या दुरुस्ती व देखभाल करिता सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात 661.73 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.