
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. युद्धाच्या तब्बल 40 व्या दिवशी अमेरिका इस्त्रायल आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली. पुढील दोन आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. पाकिस्तानमध्ये युद्धविरामासंदर्भातील पुढील वाटाघाटी होणार आहेत. मात्र जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील इराणने अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू केलेला नाहीये. या मार्गाने केवळ दिवसभरात 15 जहाजांनाच जाण्याची परवानगी इराणकडून देण्यात आली आहे. इराणने पुन्हा एकदा होर्मूजची सामुद्रधुनी सुरू करावी, ही युद्धविरामामधील प्रमुख अट होती. मात्र आता इराण या अटीचं उल्लंघन करताना दिसत आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज युद्धविरामानंतर देखील पूर्ण क्षमतेनं सुरू न झाल्यानं जगातील अनेक देशांवर अजूनही ऊर्जा संकट कायम आहे, त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे इराणवर सैन्य कारवाई होण्याची शक्यता आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूजचा मुद्दा पुन्हा एकदा सैन्य कारवाईपर्यंत येऊन पोहोचला आहे. आतापर्यंत इंग्लंडने या युद्धात कोणतीही भूमिका घेतली नव्हती, मात्र आता इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी मोठं विधान केलं आहे. माझं होर्मूजच्या सामुद्रधुनी संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलणं झालं आहे. आम्ही स्ट्रीट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी सैन्य कारवाईचा विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी असं देखील म्हटलं आहे, की आम्ही याविरोधात काही देशांची आघाडी तयार करत आहोत. आम्ही चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र आता आम्ही याविरोधात सैन्य कारवाईचा गांभीर्याने विचार करत आहोत.
दरम्यान पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये युद्धविरामाच्या पुढील वाटाघाटी सुरू आहेत, याचवेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आता हा युद्धविराम यशस्वी होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. इराणने युद्धविराम झाल्यानंतर देखील अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. यामुळे अमेरिकेवर देखील दबाव वाढत आहे. त्यामुळे आता अमेरिका काय निर्णय घेणार? ट्रम्प काय करणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.