RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा
esakal April 11, 2026 03:45 AM

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Updates: समोर कोणताही दिग्गज असो, मी तर चेंडू हाणणारच... १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ( Vaibhav Suryavanshi) हा निर्धार आता अनेकांच्या मनात भीती निर्माण करताना दिसतोय... मुंबई इंडियन्सविरुद्ध जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू ८८ मीटर लांब भिरकावल्यानंतर शुक्रवारी राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीराने जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार या दोन दिग्गजांनाही नाही सोडले.

त्याने १५ चेंडूंत अर्धशतक झळकावताना अनेक विक्रम नावावर केले आणि ध्रुव जुरेल ( Dhruv Jurel) सोबत त्याच्या १०८ धावांच्या ( ३८ चेंडू) भागीदारीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हार मानण्यास भाग पाडले. ८ चौकार व ७ खणखणीत षटकार खेचूनही पुन्हा एकदा वैभवला शतकाने हुलकावणी दिली. पण, RR ने विजयी चौकार मारून IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थान कायम राखले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या RCB ने विराट कोहलीच्या १६ चेंडूंत ३२ धावानंतरही ९४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. पण, कर्णधार रजत पाटीदार ( ६३), इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यर ( नाबाद २९) आणि रोमारिओ शेफर्ड ( २२) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ८ बाद २०१ धावा उभ्या केल्या. शंभर धावांच्या आत ६ विकेट्स गमावूनही एवढ्या धावा उभ्या करून RCB ने सर्वात्तम धावसंख्येचा विक्रम नावावर केला. पण, या धावा कमीच असल्याचे त्यांना वैभवची फटकेबाजी पाहून जाणवले. यशस्वी जैस्वालला ( १३) दुसऱ्याच षटकात जोश हेझलवूडने माघारी पाठवले. पण, वैभव व ध्रुव या जोडीने RCB ला झोडले.

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

वैभव व ध्रुव यांनी पॉवर प्लेमध्ये संघाला १ बाद ९७ धावांपर्यंत पोहोचवले. वैभवने १५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएलमधील हे संयुक्तपणे तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. कृणाल पांड्याने चुतराईने वैभवचे वादळ शांत केले. वैभव २६ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ७८ धावांवर विराटच्या हाती झेल देऊन परतला. त्याची ध्रुवसोबतची ३७ चेंडूंत १०८ धावांची भागीदारी तुटली. आयपीएलमध्ये १०० हून अधिक धावांच्या भागीदारीत सर्वाधिक रन रेट असलेल्या खेळीत वैभव व ध्रुव यांनी ( १७.५१ रन रेट) दुसरे स्थान पटकावले.

वैभवच्या विकेटनंतर RR ने शिमरोन हेटमायरला पाठवले, परंतु कृणालच्या बाऊन्सरवर अपर कट मारण्याच्या प्रयत्नात तो शॉर्ट थर्ड मॅनला झेल देऊन परतला. हेझलवूडने ४ षटकांत ४४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या, तर कृणालने ३० धावांत २ बळी टिपून स्पेल संपवली. ध्रुवने आणखी एक अर्धशतक पूर्ण करताना रवींद्र जडेजाला राजस्थानला विजयपथावर ठेवले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

दरम्यान, रवींद्र जडेजा हा ट्वेंटी-२० ४००० हून अधिक धावा आणि २०० विकेट्स असा दुहेरी पराक्रम करणारा हार्दिक पांड्यानंतर दुसरा भारतीय ठरला. जगात एकूण २५ खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. राजस्थानने १८ षटकांत ४ बाद २०२ धावा करून विजय मिळवला. ध्रुव जुरेल ४३ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावांवर नाबाद राहिला, तर जड्डूने २४ धावा केल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.