पुणे/ पाषाण - शहरातील निसर्गरम्य पाषाण तलाव परिसराला सध्या जलपर्णीचा मोठा विळखा पडला असून, येथील पर्यावरणीय समतोल पूर्णपणे बिघडला आहे. रामनदीतून आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमधून येणारे मैलामिश्रित सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट तलावात सोडले जात आहे. परिणामी, तलावातील पाण्यातील प्राणवायूची पातळी कमालीची घटली असून, गेल्या काही दिवसांपासून हजारो मासे मृत पावत आहेत. या वाढत्या प्रदूषण, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाषाण तलावात मासे मोठ्या संख्येने मृत पावत आहेत. संपूर्ण तलावावर जलपर्णीचा हिरवा गालिचा पसरला असून, तलावाचे अक्षरशः डबक्यात रूपांतर झाले आहे. सांडपाणी, जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती प्रचंड वाढली असून, परिसरात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची मोठी भीती निर्माण झाली. याबाबत पर्यावरणतज्ज्ञ शैलजा देशपांडे म्हणाल्या, ‘मासे जिवंत राहण्यासाठी पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण साधारण ४ ते ५ पीपीएम असणे आवश्यक असते.
मात्र, तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्यातील घटकांचे विघटन करण्यासाठी पाण्यातील मोठ्या प्रमाणावर प्राणवायू वापरला जातो. त्यातच संपूर्ण तलावावर जलपर्णीचे आच्छादन असल्याने पाण्यात सूर्यप्रकाश आणि हवा मिसळू शकत नाही. यामुळे प्राणवायूची पातळी वेगाने खालावते आणि माशांचा गुदमरून मृत्यू होतो.
‘रामनदीवर अद्याप एकही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नसल्याने नदीच्या उगमापासूनचे सर्व रासायनिक घटक, प्रदूषके थेट पाषाण तलावात जमा होत आहेत. या रसायनांमुळे पाण्याचे तापमान वाढते, जे संवेदनशील जलचरांसाठी प्राणघातक ठरते. अनेकदा रात्रीच्या वेळीच प्रदूषके, रसायने तलावात सोडली जातात. त्यामुळे पहाटेच्या सुमारास प्राणवायू न मिळाल्याने मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात आणि मृत्युमुखी पडतात,’ असेही देशपांडे यांनी सांगितले.
पाषाण तलावाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जलपर्णीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, प्रशासनाने केवळ तात्पुरती स्वच्छता न करता सांडपाणी रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
- विवेक पाटील, स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी
येत्या दोन-तीन दिवसांत मी स्वतः पाषाण तलावाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहे. या समस्येवर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- किशोरी शिंदे, उपायुक्त, पर्यावरण विभाग, महापालिका