Manchar Home Fire : मंचरजवळ निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; १५ लाख रुपयांचे नुकसान, जीवितहानी टळली
esakal April 11, 2026 03:45 AM

मंचर - आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे भरवस्तीत शुक्रवारी (ता. १०) दुपारी लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली. या आगीत दागिने, धान्य, रोख रक्कम, शालेय साहित्य व संसारोपयोगी वस्तूंसह सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

या दुर्घटनेत सुमन दशरथ निघोट यांच्या घरातील सुमारे दहा तोळे सोने, ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, धान्य, शालेय पुस्तके व सागवानी लाकडाचे छप्पर जळून खाक झाले. त्यांच्या कुटुंबाचे सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच संगीता महादेव चिखले यांचे घर पूर्णतः जळाले असून त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. निलेश नंदकुमार निघोट व सुभाष कोंडीबा निघोट यांच्या घरांचेही अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांचा निवारा हिरावला गेला आहे.

आगीची माहिती मिळताच सरपंच नवनाथ निघोट व ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीचे रौद्ररूप पाहता प्रयत्न निष्फळ ठरले. मुंबई येथील अग्निशमन दलात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर निघोट यात्रेनिमित्त गावात आले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत तीन गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या वेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत पाच दिवसांपूर्वी व्होल्टेज चढ-उताराबाबत तक्रार केली होती, असे सरपंच नवनाथ निघोट यांनी सांगितले. महावितरणने जबाबदारी न स्वीकारल्यास वीजबिल भरणार नाही, असा इशारा पंचायत समिती सदस्य शिवाजीराव निघोट यांनी दिला आहे.

मात्र, महावितरणने हे आरोप फेटाळले असून मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होता, घरातील वायरिंगमधील दोषामुळे आग लागल्याचा दावा सहाय्यक अभियंता गफूर शेख यांनी केला. याबाबत इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर तपास करणार असून अहवालानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.