कल्याणमध्ये पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. चक्क एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवण्यात आली. तोतया पोलीस बनून आलेल्या भामट्यांनी या वृद्धाला चक्क २७ लाख ९० हजार रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या सात दिवसांपासून हा मानसिक छळाचा आणि फसवणुकीचा खेळ सुरू होता. व्हॉट्सॲप कॉलवर ‘मुंबई पोलीस’ असल्याचे भासवून थेट ‘दहशतवाद्यांशी’ संबंध असल्याचे सांगत गंडा घातला . जाणून घेऊया सविस्तर.
नेमकं काय घडलं ?
कल्याण पश्चिमेकडील वाडेघर परिसरात राहणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याला सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईस्माईल अब्बास सुरका (वय ६३, रा. रौनक सिटी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सात दिवसांपूर्वी सुरका यांना व्हॉट्सॲपवर एक कॉल आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख मुंबई पोलीस दलातील ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक आकाश शर्मा’ अशी करून दिली. “तुमचे संबंध ‘डॉ. शाईन फाईल’ या दहशतवाद्याशी असून तुमच्या खात्यातून संशयास्पद व्यवहार झाले आहेत,” अशी थाप मारून सुरका यांना घाबरवून सोडण्यात आले.
तोतया पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलवर पोलीस गणवेशात दिसत असल्याने सुरका यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.तब्बल आठवडाभर चौकशीच्या नावाखाली सुरका यांना ‘डिजिटल ॲरेस्ट’ म्हणजे एका जागी बसवून ठेवण्यात आले. “या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो,” असे सांगून आरोपी आकाश शर्मा आणि प्रेमा कुमार यांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी ऑनलाइन स्वरूपात २७ लाख ९० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरका यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
गुन्हा दाखल करून तपास सुरू
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत. केवळ सुरकाच नव्हे, तर गेल्या काही दिवसांत कल्याण-डोंबिवलीत अशा अनेक घटना घडल्या आहेत. याआधी पारनाका येथील महिलेची 63 लाख 50 हजारांची फसवणूक ,महात्मा फुले चौक हद्दीतील सेवानिवृत्ताची 23 लाख 50 हजारांची लूट, तसेच डोंबिवलीतील एका नोकरदाराची तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी 71 लाख 10० हजारांची फसवणूक केली. यामुळे आता कोणताही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलवर अशा प्रकारे पैशांची मागणी करत नाही किंवा ‘डिजिटल ॲरेस्ट’ करत नाही. नागरिकांनी अशा कॉलला बळी पडू नये आणि तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस करत आहे