मथुरेत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू
Marathi April 11, 2026 05:25 PM

वृंदावनमध्ये यमुना नदीत दुर्घटना : 22 जणांचा बचाव

वृत्तसंस्था/ मथुरा

उत्तर प्रदेशातील मथुरा जिह्यात वृंदावनमध्ये भाविकांना घेऊन जाणारी एक बोट तरंगत्या पुलाला धडकून उलटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सायंकाळपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर 22 जणांना सुखरूप वाचवण्यात आले होते. मृतांमध्ये 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. बोटीतील सर्व पर्यटक-भाविक पंजाबचे होते. ते वृंदावनहून देवराहा बाबा मठाकडे जात असताना यमुना नदीत बोट उलटल्याचे मथुराचे पोलीस अधीक्षक सुरेश चंद रावत यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्याचा भाग म्हणून एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने कारवाई करत 22 जणांना वाचवले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, बोटीतून अनेक भाविक नदी पार करत होते. प्रवासादरम्यान बोट तरंगत्या पुलाला धडकल्यानंतर तोल जाऊन ती उलटली. सर्व प्रवासी जागीच नदीत पडले. यमुना नदीच्या पाण्याची पातळी आणि खोलीमुळे हा अपघात अधिकच भीषण झाला. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस आणि प्रशासकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी बचावकार्य सुरू केले. बचाव पथकाच्या मदतीने 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, त्यापैकी एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

गटात 150 भाविक

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या गटात अंदाजे 150 भाविक होते, जे वृंदावनला भेट देण्यासाठी पंजाबमधील लुधियाना आणि उत्तराखंडमधील मुक्तेश्वर येथून आले होते. ही बोट एका खासगी नावाड्यामार्फत चालवली जात होती. अपघातानंतर बोटही नदीत बुडाली असून, तिचा शोध सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दु:खद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मथुरा जिह्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानी अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तसेच शोकाकुल कुटुंबांप्रति संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदतकार्य सुरू करण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.