अकोला : अधिवेशनाच्या काळात शंभुराज देसाईंचं (Shambhuraj Desai) साताऱ्याचं प्रकरण होतं, त्यांच्यासोबत त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार एकवटले. पण आपण अजितदादांचा फोटो घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनासाठी बसलो होतो, पण विनंती करूनही कुणीही आलं नाही अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी केली. त्यावेळी जर आमदार आपल्यासोबत आंदोलनासाठी बसले असते तर अजितदादांच्या अपघाताच्या तपासप्रकरणी आज वेगळं चित्र असतं. दुर्दैवाने आफण ती वेळ गमावून बसलो अशी खंतही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.
अमोल मिटकरी यांनी लाईव्ह संवादातून अनेक धक्कादायक मुद्दे मांडले. अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं, विमानात किती लोक होते, पायलट कोण होता, आणि ब्लॅक बॉक्सचा डेटा अद्याप का जाहीर करण्यात आला नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अपघाताला अडीच महिने उलटूनही सत्य समोर आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी अमोल मिटकरींनी ‘जस्टिस फॉर दादा’ (Justice For Dada) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
अपघातानंतर 15 दिवसांत ब्लॅक बॉक्स डेटा जाहीर करण्याचं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलं होतं. मात्र, अडीच महिने उलटूनही तो डेटा समोर आलेला नाही. तसेच विमानतळावरील CCTV फुटेजही अद्याप जाहीर न झाल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे मिटकरी यांनी म्हटलं.
अजित पवारांचे विमानतळावरील गेट नंबर 8 पासून विमानात बसण्यापर्यंतचे फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. विमानात 6 जण होते की 5, हे स्पष्ट व्हायला हवे, असं मिटकरी म्हणाले.
मिटकरी यांनी DGCA च्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपघातानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात अनेक विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला. अपघातस्थळी झाड नव्हते, तरी अहवालात झाड दाखवले, असा दावा त्यांनी केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा आणि सत्य समोर यावे यासाठी ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलन सुरू करण्याची घोषणा अमोल मिटकरी यांनी केली आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर यात्रा काढून जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. ग्रामसभांमध्ये ठराव मंजूर करून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सादर केले जाणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितले.
या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सरकारवर चौकशी लांबवण्याचा आरोप केला असून, सत्ताधाऱ्यांकडून यावर तपास सुरू असल्याचं उत्तर दिलं जात आहे. अजित पवार यांच्या अपघाताबाबतचे प्रश्न अनुत्तरित असल्याने हा मुद्दा आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा