भटकंती : ताम्रपट-दानाचा इतिहास
Marathi April 12, 2026 09:25 AM

<<आशुतोष बापट>>

[email protected]

प्राचीन काळात राजे-महाराजांनी केलेल्या दानांचे उल्लेख असलेले ताम्रपट सापडतात. इतिहासाचा अभ्यास करताना हीच दानपत्रे एक मोठा दुवा होऊन जातात.

‘दा’ म्हणजे देणे यावरून दान हा शब्द तयार झालेला आहे. वस्तूचे मूल्य न घेता तिच्यावरची आपली मालकी नष्ट करून तिथे दुसऱ्याची मालकी उत्पन्न करणे, अशा प्रकारचा जो त्याग, त्याला दान म्हणतात. दानाचे ढोबळमानाने 4 प्रकार सांगितले आहेत. कोणत्याही फळाचा उद्देश मनात न धरता केलेले दान, पापनाश किंवा प्रायश्चित्त हा उद्देश, संतती, संपत्तीच्या प्राप्तीसाठी केलेले आणि भगवंताच्या संतोषासाठी धर्मयुक्त अंतकरणाने व निष्काम बुद्धीने दिलेले दान.

विशिष्ट पुण्यदिवशी अथवा ग्रहणादि पर्वकाळी दाने देण्याची प्रथा आपल्याला पूर्वापार चालत आलेली दिसून येते. मुख्यत्वे राजे-महाराजांनी अशा विशिष्ट समयी मोठय़ा प्रमाणावर दाने दिल्याचे उल्लेख आपल्याला दिसून येतात. ही दाने देताना ती घटना तांब्याच्या पत्र्यावर लिहून नोंदवून ठेवलेली दिसते. याचे कारण असे की, याद्वारे हे दान पिढ्यानपिढ्या  सुरू राहावे, तसेच पुढे येणाऱ्या राजांना याची माहिती असावी या उद्देशाने तांब्याच्या पत्र्यावर हा मजकूर कोरून ही दानपत्रे तयार केली जातात. इतिहासाचा अभ्यास करताना हीच दानपत्रे एक मोठा दुवा होऊन जातात. प्राचीन इतिहासाचा अभ्यास करताना, त्याची संगतवार मांडणी करताना या दानपत्रांचा मोठा उपयोग होतो आहे. जेव्हा कोणी सम्राट एखाद्या देवस्थानाला किंवा ब्राह्मणाला कुठले गाव, क्षेत्र दान म्हणून देत असे त्याचा स्पष्ट उल्लेख या ताम्रपटात केलेला असे. नुसता त्याचाच उल्लेख नव्हे तर अनेकदा त्या राजाची वंशावळ, त्याने विविध युद्धांत प्राप्त केलेले विजय आणि त्या राजाची विविध विशेषणे त्या ताम्रपटात उल्लेखिलेली दिसतात. त्यामुळे ताम्रपट या एकाच साधनावरून इतिहासाची सर्वंकष जुळणी करता येते.

शिलालेख आणि ताम्रपट यात मुख्य फरक म्हणजे ताम्रपट हे चल असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जाऊ शकतात. त्यामुळे अनेकदा ताम्रपटांचा आढळ एका ठिकाणी दिसतो तर त्यात उल्लेख  केलेली माहिती ही कुठल्या निराळ्या प्रदेशाचे वर्णन करते. ग्रहणकाळ हा सर्वात महत्त्वाचा पर्वकाळ समजला गेला आहे. या काळात केलेल्या दानामुळे मोठेच पुण्य लाभते अशी समजूत असल्यामुळे या काळात जास्तीत जास्त दाने दिलेली दिसून येतात. दाने देताना जेव्हा एखादे गाव दान म्हणून दिलेले असेल तर त्या गावाच्या चतुःसीमासुद्धा सांगितलेल्या असतात. त्यावरून आज प्रचलित असलेली गावे त्याकाळी कुठल्या नावाने प्रसिद्ध होती याची जाणीव होते.

उदाहरणार्थ पुण्याच्या बाबतीत बघायला गेले तर राष्ट्रकुट राजा कृष्ण याने इ. स. 758 आणि 768 साली दिलेल्या ताम्रशासनात, तसेच ठाण्याचा शिलाहार राजा याने इ. स. 993 साली दिलेल्या ताम्रशासनात पुण्याचा उल्लेख ‘पुणकविषय देश’ असा आलेला आहे. इ. स. 758 सालचा राष्ट्रकुट राजा कृष्णाच्या ताम्रपटात त्याने पूगडी भट या ब्राह्मणास बोपखेल हे गाव, हेमलंबी संवत्सरात, अश्विन अमावास्येच्या सूर्यग्रहणाचे दिवशी इनाम दिले असा उल्लेख आहे. त्या ताम्रपटात त्याने बोपखेलच्या चतुःसीमा दिलेल्या आहेत.

पवित्र विषयातील बोपरखालू गाव. त्याच्या समोर एक कुंड आहे.

दक्षिणेला मूईला नदी. पश्चिमेला दर्पपूडिका.

उत्त (आणि) ते भेसरी ग्राम.

असा मजकूर असून पुण्याचा उल्लेख पुणक-विषय असा स्पष्ट केला आहे. बोपखेलच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये कळस, मुळा नदी, दापोडी आणि भोसरीचा या लेखात असलेल्या उल्लेखावरून त्याकाळी  पुणे एखाद्या तालुक्याचे ठिकाण असण्याएवढे मोठे होते असे समजते.

ताम्रपटावरून इतिहासाचे असे नेमके ज्ञान होते. आडिवरेजवळ असलेल्या कशेळीचा ताम्रपट हा असाच एक प्रसिद्ध दानपट आहे. इ. स. 1191 मधील या ताम्रपटानुसार द्वितीय भोज राजाने गंडरादित्य कुमाराच्या सांगण्यावरून कोकणातील अट्टविरे (आडिवरे) भागातील कशेळी गाव बारा ब्राह्मणांच्या प्रतिदिन भोजनासाठी दान दिले.

दानाचा उद्देश हा पुण्यप्राप्ती हा होय. आपण दिलेले दान हे अक्षय्य राहावे, चिरकाल टिकावे म्हणून ते ताम्रपटावर नोंदवून दिले जायचे. तत्कालीन राजांचा हा खटाटोप आजच्या इतिहास अभ्यासकांना पर्वणी ठरलेला आहे. वाकाटक, गुप्त, शिलाहार, यादव या राजांनी दाने दिलेले अनेक ताम्रपट आजही उपलब्ध आहेत. त्यावरून त्या राजांची वंशावळ, त्यांचे धार्मिक आचरण, त्यांचा आर्थिक स्तर तसेच प्रजेप्रति असलेला दृष्टिकोन इतक्या बाबी त्यांच्या ताम्रपटावरून समजतात.

जितके पुण्य त्यांना दान दिल्याने लाभले असेल त्याच्या कित्येक पटीने जास्त पुण्य त्यांना आजच्या अभ्यासकांनी दिलेल्या दुव्यामुळे लाभले असणार हे नक्की. दानासाठी वापरलेला ताम्रपट हे मध्यम अशा प्रकारे इतिहासाचे एक मोठे साधन होऊन राहिलेले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.