सारिका चाटुफळे-कुलकर्णी - saptrang@esakal.com
एका नदीच्या काठावर एक चिंटू नावाचे माकड राहत असे. जेन झी चिंटू एक अत्यंत प्रसिद्ध व्लॉगर होता. नवनवीन ठिकाणे शोधून त्यांचे माहितीपर व्लॉग्स तयार करणे हे काम चिंटू करत असे. तो अतिशय हुशार, बोलघेवडा होता. मार्केटिंगमध्ये तर एकदम तज्ज्ञच होता. इन्स्टाग्राम, यूट्युब अशा कित्येक सोशल मीडिया साइट्सवर त्याचे व्लॉग्स प्रसिद्ध होऊ लागले. ''जांभूळ बाबा'' नावाने त्याने आपली मग स्वतःची कंपनी चालू केली.
चिंटू माकड अगदी जगन्मित्र होता. कोणाशीही त्याची फार लवकर मैत्री होत असे. पण आपल्या व्लॉगिंगसाठी त्याने कधीही कोणाच्या मैत्रीचा फायदा करून घेतला नाही. त्याच्या उत्तम मार्केटिंग तंत्राने आणि रंजक बोलण्याने त्याचे प्रेक्षक प्रभावित होऊ लागले. हळूहळू जांभूळ बाबा ही कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचली. त्याला कोट्यवधी व्ह्यू मिळू लागले. कंपनी युनिकॉर्न होण्याच्या मार्गावर होती. चिंटू माकडाबरोबर आता अजून काही साथीदार या कंपनीला लाभलेले होते. प्रत्येकाच्या कष्टाचा मोबदला त्यांना पुरेपूर मिळत होता.
एकदा यश मिळू लागले, की मग या यशात भागीदार होण्यासाठी कित्येक लोक टपलेले असतातच! चिंटूच्या आजूबाजूला अशा भाटांची काही कमतरता नव्हती.
एकदा चिंटू बाहेरच्या देशात एका बिझनेस प्रपोझलवर चर्चा करण्यासाठी जाण्याच्या तयारीत होता. विमानतळावर व्हीआयपी लाउंजमध्ये तो बिझनेस मॅगेझिन वाचत बसलेला असताना शेजारी लूची नावाचा एक मगर येऊन बसला. चिंटू आणि लूची एकमेकांकडे बघून ओळखीचे हसले. खरे तर लूची चिंटूला चांगलाच ओळखत होता. असेही चिंटूला ओळखत नाही असे भारतात तरी कोणी सापडले नसतेच. थोडा वेळ तिथे बसल्यावर लूची चिंटूला म्हणाला, "तुम्ही जांभूळ बाबांचे चिंटू ना?"
चिंटू अत्यंत नम्रपणे म्हणाला, "हो हो, मी चिंटू."
लूची पुढे बोलू लागला, "तुमचे सगळे व्लॉग्स बघतो मी. एकंदरच सगळ्या ठिकाणांबद्दल, तिथल्या इतिहासाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल, तिथल्या खानपानाबद्दल, भूगोल, राजकारण अशा सगळ्याच अंगाने तुम्ही दिलेली माहिती मला फार आवडते. विशेष करून तुमचा ''गोदातीरी जांभूळबनात'' हा व्लॉग मला अत्यंत आवडला. गोदावरी नदी, तिच्या आसपासचा सुपीक प्रदेश अशी सगळी माहिती तुम्ही किती छान दिलेली आहेत. केवढा अभ्यास आहे तुमचा."
Psychology of boredom : कंटाळा ही क्रिएटिव्हिटीची जननी: स्क्रीनच्या हायपर वेगात हरवलेल्या पिढीला ‘नुसतं बसून राहण्याचा’ धडाचिंटू म्हणाला, "तुम्ही खूपच बारकाईने सगळे बघता हे लक्षात आलेच आहे. तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांमुळे तर माझ्यासारख्या व्लॉगरला एवढी मान्यता मिळते. अहो आपण ज्या व्यवसायात आहोत त्यात नीट अभ्यासाने उतरायला हवेच. जे करतो आहोत ते प्रामाणिकपणे करायला मला आवडते."
लूची म्हणाला, "तुम्हाला चालणार असेल तर मला तुमचा फोन क्रमांक द्याल का? माझी पत्नीदेखील तुमची खूप मोठी चाहती आहे. मी आणि ती व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आहोत. विविध कंपन्यांमध्ये ज्यांना गुंतवणूक करायची असते त्यांना ती करण्याचा मार्ग दाखवतो."
दोघांचे फोन क्रमांक एकमेकांना दिले गेले. विमानाची घोषणा झाली. दोघेही उठले. चिंटू विमानाच्या रांगेत जाऊन उभा राहिला, त्याच्या आजूबाजूला चाहत्यांचा गराडा पडला. लोक येऊन त्यांच्याबरोबर फोटो काढून घेऊ लागले. ''सुप्रसिद्ध व्लॉगर जांभूळ बाबा यांच्याबरोबर'' अशी टॅगलाइन ठेवून आपापले चिंटूबरोबरचे फोटो इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाॅट्सअप स्टेटस आणि स्टोरीला लावू लागले. चिंटूला या सगळ्याची सवय होती. प्रायोरिटी चेक इन मधून चिंटू आपल्या बिझनेस क्लास सीटवर जाऊन बसला आणि बघतो तर काय? शेजारीच लूची बसलेला होता.
विमानाच्या संपूर्ण प्रवासात दोघांच्या मनसोक्त गप्पा झाल्या. आपण बाहेरच्या देशात नक्की कुठले प्रपोजल घेऊन चाललो आहोत हे देखील बोलता बोलता चिंटूने लूचीला सांगितले. लूचीने देखील आपल्या व्यवसायाबद्दल त्याला विस्तृतपणे सांगितले. दोघे आता चांगलेच मित्र झाले होते. बाहेरच्या देशात गेल्यावर वेळ काढून तिथेदेखील दोघे भेटले. एकत्र जेवण केले. दोघांनाही एकमेकांचे चांगले मित्र झाल्याची खूण पटलेली होती. भारतात आल्यावरही वेळात वेळ काढून दोघे चिंटूच्या ऑफिसमध्ये भेटू लागले. चिंटूला आपला व्यवसाय अजून कसा वाढवता येईल, शिवाय त्याची गुंतवणूक चिंटू कुठे कुठे वाढवू शकतो, कुठकुठल्या कंपनीमधील गुंतवणूक चिंटूला फायद्याची ठरेल, असे काही उत्तम सल्ले लूची मगराने चिंटू माकडाला दिले.
लूचीच्या बायकोला देखील आता दोघांच्या मैत्रीबद्दल ठाऊक झालेले होते. ती चिंटूची चाहती होतीच. त्यामुळे ''चिंटूला आपल्या घरी लवकरात लवकर घेऊन या,'' असा तगादा तिने कित्येक दिवसांपासून लूचीच्या मागे लावलेला होता.
चिंटू एवढा प्रसिद्ध होता तर त्याच्या आणि आपल्या नवऱ्याच्या मैत्रीचा फायदा आपल्या व्यवसायासाठी करून घ्यावा, असे तिच्या डोक्यात घोळत होते. हळूहळू करून चिंटूच्या कंपनीला आपल्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायला लावावी असा तिचा विचार होता. तिने लूचीला तसे बोलूनही दाखवले होते. सुरुवातीला लूचीचा याला विरोध होता. चिंटूने त्याच्याशी खूप विश्वासाने मैत्री केलेली असल्याने त्याला असे करायला लावणे म्हणजे त्याच्याशी विश्वासघात करणेच होईल असे त्याला वाटत असे. पण त्याची पत्नी अत्यंत लोभी होती. तिच्यावर लूचीचे मनापासून प्रेम होते. इतके की लूची सोशल मीडियावर बायकांना ''जेवण झाले का'' असे देखील विचारत नसे. अखेरीस तो चिंटूला घरी घेऊन येईल आणि लूचीची पत्नी गुंतवणुकीची बोलणी करेल असे ठरले.
चिंटूला आग्रह करून एके दिवशी लूची घरी घेऊन आला. लूचीच्या पत्नीने त्याचे जोरदार आदरातिथ्य केले. भरपूर गप्पा, खाणे-पिणे यात सगळ्यांचा वेळ खूपच मजेत गेला. लूचीच्या पत्नीने अखेर चिंटूकडे त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्याबद्दल विषय काढला. खरे तर ती हट्टालाच पेटली. चिंटूने नकार दिल्यावर तर तिचा जोर अजून वाढला. जर त्याने अशी गुंतवणूक केली नाही तर ती त्याला सोशल मीडियावर ट्रोल करेल, खोटेनाटे आरोप करेल अशी धमकीच तिने दिली. हे सगळे होत असताना लूची मात्र शांत बसला होता. याचा चिंटूला फार मोठा धक्का बसला. आपला चांगला मित्र असे वागू शकतो याचे त्याला वाईट वाटले होते.
तो लूचीच्या पत्नीला म्हणाला, "तुम्ही मला सोशल मीडियावर कितीही ट्रोल केले तरीही मला काहीही फरक पडणार नाही. माझ्या हितशत्रूंचे हे याआधीच करून झालेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी मी कदाचित तयार झालो असतो. पण तुम्ही आता अशा धमक्या दिल्यावर ती शक्यता दुरापास्त आहे. शिवाय माझ्या कंपनीची एक उपकंपनी आहे, ''हार्ट मीडिया'' या नावाने माझी पत्नी ती चालवते. माझ्या कंपनीची हार्ट मीडियामध्ये मोठी गुंतवणूक असल्याने मी अजून कुठे गुंतवणूक करावी की नाही हे माझी पत्नीच ठरवू शकते."
असे बोलून अत्यंत दुःखी अंतःकरणाने चिंटू निघून गेला. त्यानंतर लूचीचे आणि त्याचे संबंध कायमचे संपले.
तात्पर्य - मगरला पत्नी असते तशीच ती माकडाला देखील असूच शकते.
लेखिका - चिंटूच्या ‘जांभूळ बाबा’ या ब्लॉगची चाहती.