अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता केवळ रामललाच नाही, तर मंदिर परिसरातील सर्व १८ मंदिरांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. ही नवीन व्यवस्था येत्या १३ एप्रिलपासून म्हणजेच वैशाख कृष्ण एकादशीपासून सुरू होत आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या नवीन व्यवस्थेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. सुरुवातीचे तीन महिने ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यात दररोज १५०० भाविकांना 'ऑनलाइन पास'द्वारे या सर्व मंदिरांचे दर्शन घेता येईल. या विशेष पासचे बुकिंग शुक्रवारपासूनच सुरू झाले आहे.
राम मंदिर निर्माण प्रभारी गोपाल राव यांनी सांगितले की, या १५०० पासांचे तीन भाग करण्यात आले आहेत. यामध्ये ५०० पास 'सुगम दर्शना'साठी, ५०० पास 'विशिष्ट दर्शना'साठी आणि ५०० पास 'सामान्य दर्शना'साठी असतील. हे सर्व पास 'आधी येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर ऑनलाइन उपलब्ध करून दिले जातील.
या पासचा वापर करून भाविकांना आधी रामललाचे दर्शन घडवले जाईल. त्यानंतर दक्षिण बाजूच्या पायऱ्यांवरून त्यांना राम परिवाराच्या दर्शनासाठी पाठवण्यात येईल. तिथून भाविक शेषावतार मंदिर, सप्त मंडपम आणि कुबेर नवरत्न टीला या ठिकाणांचे दर्शन घेऊ शकतील. दर्शन पूर्ण झाल्यावर भाविक परकोटा (तटबंदी) परिसरातून बाहेर येऊन लॉकर रूममधून आपले सामान घेऊन बाहेर पडू शकतील.
भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कुबेर नवरत्न टीला येथील मातीचे परीक्षण केले असता, तिथे एका वेळी ठराविक वजनच असणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच सुरक्षा आणि संरचनेचा विचार करून एका वेळी १५०० भाविकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दर्शनासाठी काही नियम देखील कडक करण्यात आले आहेत. एका कुटुंबातील जास्तीत जास्त पाच व्यक्तींनाच एकत्र पास मिळू शकणार आहे. ऑनलाइन अर्जासाठी अर्जदाराचा फोटो आणि प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनला जाताना आपले मूळ आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे, कारण सुरक्षा तपासणीच्या वेळी ते दाखवावे लागेल. हे पास सकाळी ७ ते रात्री ९ या दरम्यान दोन-दोन तासांच्या स्लॉटमध्ये उपलब्ध असतील.