Gondia: पाणी आणि शिकारीच्या शोधात भटकंती करणारा वाघ एका कठडा नसलेल्या विहिरीत पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सर्रा माल्ही गावाच्या शेतशिवारात वाघाचा हा मृतदेह विहिरीत आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा वाघ चार दिवसांपूर्वी शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात इथल्या एका उघड्या विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाघाचा मृतदेह तरंगताना दिसताच ग्रामस्थांनी वनविभागाला पाचारण केलं. वनविभागाच्या विशेष पथकानं अथक प्रयत्नांनंतर या मृत वाघाला विहिरीबाहेर काढलं. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तो केवळ अपघाती होता की, यामागे शिकारीचा काही कट आहे? या प्रश्नांची उत्तरं आता उत्तरीय तपासणीनंतरचं स्पष्ट होतील. वनविभागानं 'व्हिसेरा सॅम्पल' प्रयोगशाळेत पाठवले आहेत. वनविभागाच्या अहवालात काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सर्रा माल्ही गावाच्या शेतशिवारात एका उघड्या, कठडा नसलेल्या विहिरीत पडून वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाघ पाणी किंवा शिकारीच्या शोधात फिरत असताना तोल जाऊन या विहिरीत पडला असावा. ही विहीर पूर्णपणे उघडी असून तिच्याभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुमारे चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना दिसताच ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या विशेष पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर मृत वाघाला विहिरीबाहेर काढले. या संपूर्ण कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांचीही मदत घेण्यात आली.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये देशभरात एकूण 169 वाघांचे मृत्यू झाले होते. महाराष्ट्रात 2025मध्ये तब्बल 41 वाघांचे मृत्यू झाले होते. वाघांचे नष्ट होत जाणारे नैसर्गिक अधिवास,जंगल तोड , मानवी हस्तक्षेप, आजारपण, आणि अवैध शिकारीसारख्या अनेक कारणांमुळे देशातील वाघांची संख्या कमी होत आहे.महाराष्ट्रातील एकूण वाघांच्या मृत्यूंपैकी सुमारे एक तृतीयांश मृत्यू हे व्याघ्र प्रकल्प किंवा संरक्षित क्षेत्राच्या बाहेर झाले आहेत.