भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन समितीसाठी उद्या (ता. १३) उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. या समितीवर सुमारे १२ सदस्यांची नेमणूक होणार आहे. यापेक्षा अधिक अर्ज आल्यास १७ एप्रिलला निवडणूक होणार आहे.
महापालिकेच्या परिवहन सेवेची सद्यःस्थिती लक्षात घेत परिवहन समितीची स्थापना होणे आवश्यक होते. त्यानुसार या समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत १२ सदस्य असणार आहेत. हे सदस्य नगरसेवकांमधून नियुक्त न करता बाहेरून नियुक्त करण्यात यावेत, असा निर्णय महासभेने घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाने निवडणुकीची कार्यवाही सुरू केली आहे. निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज सादर करायचे आहेत. १४ एप्रिलला अर्जांची छाननी होऊन आवश्यकता भासल्यास १७ एप्रिलला निवडणूक घेतली जाणार आहे.
१२ सदस्य निवडीसाठी नगरसेवक मतदान करणार असल्याने निवडणूक अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून नगरसेवकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक असणार आहे. परिवहन समितीचे सदस्य होण्यासाठी उमेदवार मिरा-भाईंदर हद्दीत मतदार असणे आवश्यक आहे. उमेदवाराला प्रशासनाचा अथवा परिवहनाचा अनुभव असणे, त्याचप्रमाणे अभियांत्रिक, औद्योगिक, वाणिज्यिक, वित्तीय किंवा कामगारविषयक बाबतची क्षमता दिसून आली असेल अशी कागदपत्रे त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. परिवहन समितीच्या निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या निवडणुकीप्रमाणेच आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सत्ताधारी भाजपकडे संख्याबळ असल्याने परिवहन समितीदेखील भाजपच्याच ताब्यात राहणार असून, १२ पैकी १० सदस्य भाजपचे व दोन सदस्य विरोधी पक्षांचे असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.