अपघाताच्या दोन भीषण घटनांत दोघे ठार, अंबोली घाटात चिमुकली तर बीडमध्ये दुचाकीवरील युवकाचा मृत्यू
एबीपी माझा ब्युरो April 12, 2026 07:13 PM

Sindhudurg Beed Accident : आज सिंधुदुर्ग आणि बीड जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात ट्रकच्या धडकेत चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर आई गंभीर जखमी झाली आहे. तर  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये शिवाई बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये  तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

 ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चिमुकलीचा जागीच मृत्यू 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली फौजदारवाडी येथे फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात निकिता राऊत ही 10 वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. तर तिची आई चैताली राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. आंबोली घाटात वळणावर ही घटना घडली. अपघातानंतर पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक आंबोली घाटात पलटी झाल्याने तब्बल अडीच तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात दिले आहे. निकिता राऊत हिचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर आता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी मातेला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक आढावा घेत आहेत.

लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर शिवाई बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक, तरुणाचा जागीच मृत्यू 

लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लोखंडी सावरगावजवळ एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव शिवाई बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 20 वर्षीय अथर्व ढगे याचा जागीच मृत्यू झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. अथर्व हा अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.