विराट कोहलीचा ऐतिहासिक पराक्रम! मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 धावा करताच रचला भीमपराक्रम
Marathi April 13, 2026 01:25 AM

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, स्टार फलंदाज विराट कोहलीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्ध आरसीबीसाठी डावाची सुरुवात करताना, फिल सॉल्टसोबत फलंदाजी करत असतानाच, जेव्हा विराट 20 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पोहोचला, तेव्हा त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या संघाविरुद्ध अशी कामगिरी करून, विराट कोहली हा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहलीला त्याच्या 36व्या डावाची आवश्यकता भासली. यापूर्वी, विराटने मुंबईविरुद्धच्या 35 डावांमध्ये 980 धावा केल्या होत्या. ज्यात त्याचा स्ट्राईक रेट 129.91 इतका आहे. शिवाय, जेव्हा जेव्हा विराट कोहली मुंबईविरुद्ध मैदानात उतरतो, तेव्हा त्याची बॅट जोरदार तळपते. नेमक्या याच कारणामुळे, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाविरुद्ध त्याने सहा वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी साकारली आहे. या सामन्यातही त्याने 38 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला.

दरम्यान, प्रत्यक्ष सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, फिल सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीने आरसीबीला अत्यंत आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 120 धावांची भागीदारी रचली; या भागीदारीतील बहुतांश धावांचे योगदान फिल सॉल्टचे होते.

मात्र, अत्यंत आक्रमक शैलीत फलंदाजी करूनही, फिल सॉल्टला अखेरीस शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमवावी लागली. फिल सॉल्टने आरसीबीसाठी केवळ 36 चेंडूंमध्ये 78 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीदरम्यान, त्याने 6 षटकार आणि 6 चौकार ठोकले. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रजत पाटीदारने विस्फोटक खेळी करत आहे. या बातमीखेरीस आरसीबीने 15 षटकात 2 गडी गमावून 187 धावा केल्या आहेत. सध्या स्टाईकवर रजत पाटीदार आणि टीम डेव्हिड खेळत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.