IPL 2026 – मुंबईची चिंता वाढली, सलग पाचव्या लढतीत जसप्रीत बुमराहच्या विकेटची पाटी कोरी
Marathi April 13, 2026 03:24 AM

जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अचूक यॉर्कर हे मुंबई इंडियन्सच्या विजयाचे समीकरण मानले जाते. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा स्पर्धा जिंकली त्यातही बुमराह याचा वाटा सिंहाचा होता. 2019 मधील फायलन लढतीत तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. पण यंदाच्या हंगामात बुमराह याची गोलंदाजी बोथट झाल्याचे दिसत आहे. यंदा सलग चौथ्या लढतीत बुमराह याची विकेटची पाटी कोरी राहिली. गेल्या हंगामात मुंबईने खेळलेल्या अखेरच्या लढतीतही बुमराह एकही विकेट घेऊ शकला नव्हता. आयपीएल इतिहासात पहिल्यांदा बुमराह सलग पाच लढतीत एकही विकेट घेऊ शकलेला नाही.

रविवारी वानखेडे मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात (4 षटकात 35 धावा) बुमराहला एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या लढतीतही त्याला विकेट मिळाली नव्हती. त्यामुळे बुमराहचा खराब फॉर्म आता मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

बुमराहने या हंगामातील चार सामन्यांत एकूण 123 धावा खर्च केल्या आहे, पण त्याच्या खात्यात अद्याप एकही विकेट जमा झालेली नाही. 2014 नंतर पहिल्यांदाच बुमराहला अशा प्रकारच्या विकेटच्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यावेळीही तो सलग चार सामने विकेटशिवाय राहिला होता.

पोलार्डकडून पाठराखण

दरम्यान, सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कीरॉन पोलार्डने बुमराहचा बचाव केला होता. आम्ही बुमराहच्या विकेट्सबद्दल जास्त विचार करत नाही आहोत. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो नक्कीच बळी घेईल. तो धावा रोखण्याचे काम चोख बजावत असेल, तर ते ही संघासाठी महत्त्वाचे आहे, असे पोलार्ड म्हणाला होता.

मैदानावर काय घडलं?

आरसीबीने फलंदाजी करताना 240 धावांचा डोंगर उभा केला. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. बुमराहने या लढतीत टिचून मारा करूनही त्याला यश मिळाले नाही. डावाच्या शेवटी टीम डेव्हिडने बुमराहच्या एकाच षटकात 13 धावा कुटल्या. एकतर विकेट मिळत नाही आणि दुसरे धावाही रोखता येईना यामुळे बुमराह चांगलाच वैतागला आणि त्याने बॉलिंग मार्क जोराने मिड ऑनच्या दिशेने फेकून दिले.

मुंबईसाठी धोक्याची घंटा?

मुंबई इंडियन्ससाठी केवळ धावा रोखणे पुरेसे नाही, तर मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवून देणारा बुमराह आता बॅकफूटवर दिसतोय. आरसीबीच्या फलंदाजांनी बुमराहला विकेट न देता इतर गोलंदाजांवर हल्ला चढवण्याची रणनीती यशस्वी केल्याचे दिसून आले. हंगाम अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असला तरी मुंबईला पुनरागमन करण्यासाठी बुमराह याच्या मॅजिकल स्पेलची गरज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.