सिलिगुडीतील सभेत पंतप्रधान मोदींचा दावा : तृणमूलला द्यावा लागणार पै-पैचा हिशेब
वर्तमानपत्र / सिलीगुडी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सिलिगुडी येथील जाहीर सभेला संबोधित करता पश्चिम बंगालच्या तृणमूल सरकारवर शाब्दिक हल्ला चढविला. दार्जिलिंग आणि सिलिगुडीच्या लोकांनी नेहमीच मला भरपूर प्रेम दिले आणि शनिवारच्या रोडा शोमध्ये आलेला जनसागर पाहता बंगालने आता परिवर्तनाचा निर्धार केल्याचे स्पष्ट होते. यावेळी बंगालमधून तृणमूल सरकार जाणे निश्चित असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
=तृणमूल सरकारच्या 15 वर्षांच्या शासनात बंगालचे केवळ नुकसान झाले आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवांनी बंगालचे भविष्य निश्चित करावे. कुणाच्याही कामाच्या मूल्यांकनासाठी ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. तृणमूलने 15 वर्षांमध्ये कुठलेच काम केले नाही, केवळ भ्रष्टाचार केला आहे. सिलिगुडी हे उत्तर बंगालचे प्रवेशद्वार असून तृणमूलने जाणूनबुजून येथील पायाभूत सुविधा, उद्योग आणि पर्यटनाला मागास ठेवले आहे. केंद्र सरकारने पाठविलेला निधी तृणमूलच्या सिंडिकेटने फस्त केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
तृणमूलच्या क्रूर सरकारने मदरशांसाठी 6 हजार कोटीची तरतूद केली, तर उत्तर बंगालच्या विकासासाठी पुरेसा निधी देणे टाळले आहे. उत्तर बंगाल अतिवृष्टीला सामोरे जात असताना तृणमूल सरकार कोलकात्यात जल्लोषात मग्न होते. तृणमूल काँग्रेस हा उत्तर बंगाल, आदिवासी, चहामळे, महिला आणि युवा विरोधी पक्ष असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
4 मेनंतर बंगालमध्ये भाजप सत्तेवर येणार आहे आणि यानंतर तृणमूल काँग्रेसला मागील 15 वर्षांमधील पै-पैचा हिशेबा द्यावा लागेल असे म्हणत मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तृणमूलला लक्ष्य केले. सिलिगुडी कॉरिडॉर भारतमातेची भुजा आहे, परंतु तृणमूलने तुष्टीकरणासाठी ईशान्येला देशापासू वेगळे करण्याची धमकी देणाऱ्या तुकडे-तुकडे गँगचे समर्थन केले. आसामचे सरकार चहाच्या मळ्यातील कामगारांना जमिनीचे पट्टे आणि सुविधा देत आहे, तर दुसरीकडे तृणमूल बंगालमधील चहाच्या मळ्यांचा उद्योग नष्ट करु पाहत आहे. बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यास या कामगारांना पक्के घर, वीज, पाणी आणि भूखंड देण्यात येतील असे आश्वासन मोदींनी दिले आहे.