पुणे - ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन अशी अनेक संमेलने आपण बघतो. पण या वर्षापासून ‘वारकरी साहित्य संमेलन’देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू केले जाईल,’ अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी केली, तसेच ‘वारकरी संप्रदायाची परंपरा आबालवृद्ध जपत असल्यामुळे समाजात धर्मांध शक्तींना थारा मिळणार नाही,’ असेही सामंत यांनी म्हटले.
संत विचार प्रबोधिनी आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील, सचिन इटकर आदी उपस्थित होते.
यंदाचा कीर्तन सेवा पुरस्कार संत नामदेव महाराज यांचे वंशज केशव महाराज नामदास आणि लोककला सेवा पुरस्कार भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांना प्रदान करण्यात आला.
सामंत म्हणाले, ‘वारकरी संप्रदायाने संस्कृती जपण्याचे मोठे कार्य केले आहे. जो जो शब्द वारकरी संप्रदायाला दिला, तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. संप्रदायातील मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, वारकरी आणि राजकारणी एकत्र आल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. पण राजकारण्यांनी कीर्तनकारांकडून नम्रता, आत्मीयता आणि कठोरता घेतली पाहिजे.’
मोरे म्हणाले, ‘भारुडामुळे वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान तळागाळापर्यंत पोहोचले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, नामदेवरायांनी कीर्तने केली आणि मराठी लोकांपर्यंत तत्त्वज्ञान गेले. भारुडामधून आणखी लोकांपर्यंत वारकरी संप्रदाय घेऊन जाण्याचे काम हे एकनाथ महाराजांनी केले. सामान्य माणसाला कळेल, त्यासाठी त्यांनी भारुड नावाचा प्रयोग सुरु केला. लोकांना हसता हसता परमार्थ सांगितला.’ डॉ. भावार्थ देखणे यांनी प्रास्ताविक केले. केशव महाराज नामदास आणि चंदाताई तिवाडी यांनी मनोगत व्यक्त केले.
जीवनाचे कठीण तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडण्याचे काम हे कीर्तनकार आणि भारूडकार करत असतात. ज्ञानेश्वरी अगोदर कळत नाही म्हणून वाचत गेलो, मग कळतेय म्हणून वाचत गेलो, मग भाषणांसाठी ज्ञानेश्वरीचा आधार मला मिळाला. त्यामुळे प्रत्यक्ष जरी वारी, वारकरी, पायी चालत जाणे हे जरी होत नसले तरी आज ह्या सगळ्यांना समर्थन म्हणून, जे जे करावे लागेल ते करतो.
- चंद्रकांत पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण