'जीवलगा' गाण्याच्या रेकार्डिंगला आशाजींनी नेसलेली फाटलेली पांढरी रेशमी साडी; शांता शेळकेंची 'ती' आठवण
जयदीप मेढे April 13, 2026 05:13 PM

Shanta Shelke Memory on Asha Bhosle: संगीत क्षेत्रावर 80 वर्ष राज्य करणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचे रविवारी दुपारी मुंबईतील ब्रीच  कँडी रुग्णालयात निधन झाले. (Asha Bhosle Passed Away) ‘चुरा लिया है’, ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’ आणि ‘इन आँखों की मस्ती’ अशा विविधांगी गाण्यांमधून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आशा भोसले यांच्या मनस्वी, मोकळ्या स्वभावाची कायम चर्चा होते.  (Asha Bhosle)

पांढरी रेशमी साडी, हातात सोन्याच्या बांगड्या, कपाळावर मोठी टिकली अशा वेशात एकदा स्टेजवर उभ्या राहिल्या की स्टेज त्याचं होऊन जायचं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या विषयी अनेकजण आपल्या आठवणी सांगताना दिसतायत. त्यांच्या 'स्वरस्वामिनी  आशा' या पुस्तकात प्रतिभासंपन्न कवयित्री, लेखिका  शांता शेळके (Shanta Shelke) यांनी आशा भोसलेंच्या स्वभावाचे काही पैलू उलगडले आहेत. चला जाणून घेऊया.

"जिभेने ती जरा तिखट"

'जीवलगा, राहिले दूर घर माझे' हे शांता शेळके यांनी लिहिलेलं गाणं आशाताईंनी गायलेलं. या गाण्याच्या वेळी घडलेला एक प्रसंगही यात आहे. शांता शेळके लिहितात, आशा भोसले,माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके,कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बंगड्या घालणारी स्त्री अशी होती;जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती.

'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे" हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले अहे;त्याच्या रेकार्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातली होती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते.फाटकी साडी केवळ लकी आहे. म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे.आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या 'आमचे छोटे दादा' यामध्ये आली आहे, पण जिभेने ती जरा तिखट आहे." असं त्यांनी लिहिलंय.

निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले

त्या पुढे म्हणाल्या, " आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे,थोडक्यात काय तर मंगेशकरांच्या सोन्यासारख्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे,स्वकष्टाने, जिद्दीने, धैयनि आणि कलेच्या अखंड साधनेने आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळविले आहे." अशी आठवण शांता शेळके यांनी 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकात उलगडली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.