Asian Badminton Championship: आशियाई बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार झेप; आयुष शेट्टीला रौप्य, पण सुवर्णपदक पुन्हा हुकलं
esakal April 13, 2026 02:45 PM

निंगबो (चीन) : जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या भारताच्या आयुष शेट्टी याचा आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील स्वप्नवत प्रवास रविवारी थांबला. चीनच्या विश्वविजेत्या शी यू की याच्याकडून अंतिम फेरीच्या लढतीत आयुष शेट्टी याला २१-८, २१-१० अशी हार पत्करावी लागली.

यामुळे आयुष शेट्टी याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शी यू की याने सुवर्णपदक पटकावले. याचसोबत भारताची आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची प्रतीक्षा कायम राहिली. दिनेश खन्ना यांनी १९६५ मध्ये आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर भारतीय खेळाडूला एकेरी विभागात सुवर्णपदक पटकावता आलेले नाही.

Asia Badminton Championship: भारताच्या आयुष शेट्टीची अंतिम फेरीत धडक; वर्ल्ड चॅम्पियनला हरवून आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

आयुष शेट्टी याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये दमदार खेळ करताना अंतिम फेरीत पाऊल ठेवले होते. आयुष शेट्टी याने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या कुनलावूत वितीदसर्ण, जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या जोनाथन ख्रिस्ती व जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या ली शी फेंग यांना पराभूत करताना अव्वल दर्जाचा खेळ केला हे विशेष. मात्र, आयुष शेट्टी याला अंतिम फेरीचा अडथळा ओलांडता आला नाही. तरीही त्याने पटकावलेले रौप्यपदक उल्लेखनीय ठरले आहे.

शी यू की-आयुष शेट्टी यांच्यामधील अंतिम फेरीच्या सामन्याची सुरुवात चीनच्या खेळाडूसाठी आश्वासक झाली. त्याने नेटजवळील उत्तम खेळ करीत ४-० अशी आघाडी मिळवली. आयुष शेट्टी याच्याकडून चुका होत गेल्या अन् याचा फटका त्याला बसला. चीनच्या खेळाडूला ११-६ अशी आघाडी मिळवता आली. अखेर शी यू की याने २१-८ असा पहिला गेम जिंकत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. भारतीय खेळाडूने दमदार स्मॅश मारत महत्त्वाचे गुण मिळवले. त्याने ३-१ अशी आघाडीही घेतली. आयुष शेट्टी कात टाकत होता, पण चीनच्या खेळाडूने झोकात पुनरागमन करीत ७-७ अशी बरोबरी साधली. ब्रेकला जात असताना चीनच्या खेळाडूकडे ११-८ अशी आघाडी होती. चीनच्या खेळाडूने शानदार स्मॅशच्या जोरावर ही आघाडी १५-९ अशी पुढे नेली. आयुष शेट्टी याला पुनरागमन करता आले नाही. अखेर चीनच्या खेळाडूने २१-१० असे यश मिळवले.

Junior Badminton: ऐतिहासिक ब्राँझनंतर आता वैयक्तिक प्रकारावर लक्ष; जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा,भारतीय खेळाडूंकडून पदकाची आशा २०२३ नंतर भारताला पदक

सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने भारताला २०२३ मध्ये आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर भारताला या स्पर्धेमध्ये आता अर्थातच २०२६ मध्ये आयुष शेेट्टीच्या रूपात पदक पटकावता आलेले आहे. एकेरीमध्ये भारताचे अखेरचे पदक एच. एस. प्रणोयच्या रूपात होते. त्याने २०१८ मध्ये ब्राँझपदक पटकावले होते. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर भारताला एकेरी विभागात पदक पटकावता आलेले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.