RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती
esakal April 13, 2026 02:45 PM

IPL 2026 Points Table After MI vs RCB Match: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) रविवारी (१२ एप्रिल) डबल हेडर म्हणजे दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानात ७ विकेट्सने पराभूत केलं.

तसेच दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यांनंतर पाँइंट्स टेबलमध्ये काही बदलही झाले आहेत. याशिवाय आता सर्व संघांचे आयपीएल २०२६ मध्ये ४ सामने पूर्ण झाले आहेत.

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

गुजरातने लखनौवर विजय मिळवल्याने त्यांचे आता ४ गुण झाले आहेत. त्यांनी याआधी दिल्ली कॅपिटल्सलाही पराभूत केले होते. त्यामुळे त्यांनी थेट ५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लखनौ सुपर जायंट्सला मात्र ४ सामन्यांतील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ते ६ व्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, त्यांचेही ४ गुण असले तरी लखनौचा नेट रन रेट गुजरातपेक्षा खराब आहे. त्यामुळे त्यांना ६ व्या क्रमांकावर घसरले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाचेही ४ सामन्यांतील २ विजय आणि २ पराभवांसह ४ गुण आहेत. पण दिल्लीचा नेट रन रेट गुजरात आणि लखनौपेक्षा चांगला आहे.

दरम्यान, बंगळुरूने जरी मुंबईला पराभूत केल्याने तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. त्यांचे आता ६ गुण झाले आहेत. पण ते तिसऱ्या क्रमांकावरच कायम आहेत. बंगळुरुच्या वर पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स असून त्यांनी पहिले चारही सामने जिंकले आहे. त्यामुळे त्यांनी ८ गुण मिळवले आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर असलेला संघ पंजाब किंग्सही अद्याप अपराजित आहेत. त्यांनी ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे त्यांचे ७ गुण आहेत.

मुंबई इंडियन्स मात्र ८ व्या क्रमांकावर कायम आहेत. पहिल्या सामन्यातील विजयानंतर सलग तीन सामने मुंबईने गमावले आहेत. त्यामुळे त्यांचे २ गुण आहेत. दरम्यान सनरायझर्स हैदराबादचेही २ गुण आहेत, पण त्यांचा नेट रन रेट मुंबईपेक्षा चांगला असल्याने ७ व्या क्रमांकावर आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचेही २ गुण आहेत. मात्र त्यांचा नेट रन रेट हैदराबाद आणि मुंबईपेक्षा खराब असल्याने ९ व्या क्रमांकावर आहेत. दरम्यान पहिल्या ४ सामन्यांनंतर एकही विजय न मिळवणारा कोलकाता नाईट रायडर्स एकमेव संघ आहे. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात १ गुण आहे.

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

आता बरेच संघ सारख्या गुणांवर असल्याने पुढील टप्प्यात मोठी शर्यत रंगणार आहे. सध्यातरी राजस्थान आणि पंजाब सोडल्यास सर्वच संघांनी पराभव पाहिला आहे. त्यामुळे आता सर्व संघ आता पहिल्या चार संघात स्थान भक्कम करण्याचा आगामी सामन्यांमध्ये प्रयत्न करताना दिसतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.