पुणे - शहरात उन्हाचा तडाखा तीव्र झाली असून, तापमानाच्या पाऱ्याने चाळिशीकडे झेप घेतली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर लोहगावमध्ये पारा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुण्यात बुधवारी १५ एप्रिल रोजी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
गेल्या दोन दिवसांत कमाल तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मध्यवर्ती पुण्यासह मगरपट्टा, विश्रांतवाडी, हडपसर आदी भागांत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. रविवार (ता. १२) सुट्टीचा दिवस असल्याने घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी आणि स्कार्फचा वापर करताना दिसले.
केवळ कमाल तापमानातच नव्हे, तर किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीच्या वेळेस गारवा कमी होऊन उकाड्यात मोठी भर पडली आहे. रविवारी शहर आणि परिसरात कमाल तापमान ३९ अंश, तर किमान तापमान २०.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र आणि हवामान कोरडे होते.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि परिसरात सोमवारी (ता. १३) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानात किंचित घट होऊन ते २० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाऊ शकते. मंगळवारपासून (ता. १४) कमाल तापमानात आणखी वाढ होऊन पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असून किमान तापमान २२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
परिसर - कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
लोहगाव - ४१
कोरेगाव पार्क - ३९
मगरपट्टा - ३९
लवळे - ३९
चिंचवड - ३९