Sawan Barwal: सावन बरवालचा नवा राष्ट्रीय विक्रम ४८ वर्षांनंतर शिवनाथचा पूर्ण मॅरेथॉनमधील रेकॉर्ड मोडीत
esakal April 13, 2026 02:45 PM

रॉटरडॅम (नेदरलँड्स) : हिमाचल प्रदेशचा धावपटू सावन बरवाल याने रविवारी (ता. १२) ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एन. एन. रॉटरडॅम येथील पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी) शर्यत दोन तास, ११ मिनिटे व ५८ सेकंदांत पूर्ण करीत भारतासाठी राष्ट्रीय विक्रम नोंदवला.

याआधी १९७८मध्ये शिवनाथ सिंग याने दोन तास १२ मिनिटांमध्ये पूर्ण मॅरेथॉन शर्यत पूर्ण करीत भारताचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तब्बल ४८ वर्षांनंतर हा विक्रम मोडीत निघाला हे विशेष.

Mumbai Metro: ‘मेट्रो ४’च्या कामात मंत्र्याची आडकाठी, सहा स्थानकांसाठी आलेल्या निविदा न उघडण्याबाबत दबाव

सावन बरवाल याने भारतासाठी राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली; मात्र एलिट मॅरेथॉनपटूंमध्ये त्याला २०व्या स्थानावर समाधान मानावे लागले; मात्र तरीही त्याने केलेली कामगिरी काबिल ए तारीफ ठरली आहे. तसेच या शर्यतीत भारताच्या आणखी एका खेळाडूने सहभाग घेतला होता. त्याचे नाव गोपी थोनाकल हे होय. त्याने दोन तास १३ मिनिटे व १६ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. त्याला २३व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

अर्ध मॅरेथॉनप्रसंगी २७व्या स्थानी

रॉटरडॅम येथील मॅरेथॉन शर्यतीदरम्यान सावन बरवाल याने उत्तरार्धात मोठी झेप घेतली. २१ किमी अर्थातच अर्ध मॅरेथॉन पूर्ण झाली असताना तो २७व्या स्थानावर होता. त्याने एक तास, चार मिनिटे व ४३ सेकंदात २१ किमीची शर्यत पूर्ण केली होती; पण उत्तरार्धात त्याने मुसंडी मारली. अर्थात ३५ किमीच्या शर्यतीनंतर तो १९व्या स्थानावर पोहोचला होता. पूर्ण मॅरेथॉन शर्यत पूर्ण झाली असता तो एक स्थानाने खाली आला. त्याने २०वे स्थान पटकावले.

Pune Metro : स्वारगेट-कात्रज मेट्रोची निविदा मंजूर; तीन महिन्यांत कामाला होणार सुरुवात सावन बरवालची आतापर्यंतची कामगिरी
  • फेडरेशन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, २०२२ (दहा हजार मीटर शर्यत) - रौप्यपदक

  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, २०२२ (पाच हजार मीटर शर्यत) - ब्राँझपदक

  • आशियाई अर्ध मॅरेथॉन, २०२३ - ब्राँझपदक

  • फेडरेशन करंडक, २०२४ (पाच हजार मीटर शर्यत) - सुवर्णपदक

  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, २०२५ (पाच हजार, दहा हजार मीटर शर्यत) - दोन्हींमध्ये सुवर्णपदक

  • फेडरेशन करंडक, २०२५ (दहा हजार मीटर शर्यत) - सुवर्णपदक

  • जागतिक ॲथलेटिक्स ब्राँझ लेव्हल स्पर्धा, २०२५ (पाच हजार मीटर शर्यत) - ब्राँझपदक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.