पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणारी ‘एमबीए/एमएमएस सीईटी’ परीक्षा नऊ मे रोजी होणार आहे. याच दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत २०१९ पॅटर्ननुसार तृतीय वर्ष बी.बी.ए. अभ्यासक्रमाची परीक्षा देखील आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, एमबीए सीईटी परीक्षा नऊ मे रोजी होणार आहे. या दिवशी बीबीए अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्रातील ‘इंटरनॅशनल ब्रँड मॅनेजमेंट’सह इतर विषयांचा अंतिम पेपर दुपारी दोन ते ४.३० या वेळेत होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा जवळपास एकाच वेळेत येत आहेत. शिवाय, दोन्ही परीक्षांची केंद्र देखील वेगवेगळी आणि एकमेकांपासून दूर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका दिवशी एकच परीक्षा देणे शक्य होणार आहे.
बहुतांश विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा देत असतात. अनेक विद्यार्थी एमबीएच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत असतात. परंतु, या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने पदवी शिक्षण पूर्ण करणारी परीक्षा द्यायची की, पदव्युत्तर पदवी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी परीक्षा द्यायची, अशा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. दोन्हीपैकी एक परीक्षा न दिल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
‘आम्ही वर्षभर दोन्ही परीक्षांची तयारी केली आहे. मात्र एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने आमचे मोठे नुकसान होणार आहे. संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून यापैकी एका परीक्षेची तारीख बदलावी.’
- एक विद्यार्थी
‘सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणारी एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आणि तृतीय वर्ष बीबीए (२०१९ पॅटर्न) अभ्यासक्रमांची परीक्षा एकाच दिवशी आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयात विशेष परीक्षा देण्यासंदर्भात अर्ज सादर करावा. संबंधित अर्ज महाविद्यालयांमार्फत विद्यापीठाकडे येतील. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नियमानुसार विद्यापीठामार्फत विशेष परीक्षा घेण्यात येईल.’
- डॉ. प्रभाकर देसाई, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ