पुणे - ‘कसलीही आशा न ठेवता अनेकजण सेवाभावाने काम करत असतात. त्यामुळेच चांगुलपणा टिकला आहे. याचेच दुसरे नाव ‘धर्म’ आहे. बंधुभाव, आपलेपणा व निःस्वार्थपणे सेवा करणे हा खरा धर्म आहे’, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केले.
नांदोशी येथे ४० एकरांत उभ्या राहणाऱ्या हजार खाटांच्या ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या रुग्णालयाच्या कोनशिला संकल्प समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आदिनाथ मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, ‘लता दीदी आणि आशा ताई यांच्या संवेदनेतून उमटलेल्या स्वरांचे सामर्थ्य अलौकिक असून, त्यांचे संगीत आपल्या प्रत्येकासोबत कायम राहणार आहे. सेवेची सुरुवात करणारा हा कोनशिला समारंभ पूर्वनियोजनानुसारच होणे, ही खरेतर दोघींच्याही स्मृतींना उचित पद्धतीने दिलेली श्रद्धांजली आहे.’
फडणवीस म्हणाले, ‘मंगेशकर कुटुंबीयांनी सेवेचा सौदा केला नाही; तर सेवाभाव कायम ठेवून लाखो रुग्णांचा आधारवड ठरणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची भव्य इमारत उभी केली. आज परवडणाऱ्या दरातील चिकित्सेची सर्वाधिक गरज आहे. अशावेळी रुग्णसेवेतील ३६० अंशाचा विचार करून उभी केली जात असलेले ‘लताआशा रुग्णालय’ मोलाचे आहे. या परिसराकडे येणारा रस्ता प्रशस्त करणे आणि पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी सरकार सहकार्य करेल. तसेच धर्मादाय संस्थांना सवलती देण्याचाही प्रयत्न करू.’
शिंदे म्हणाले, ‘‘आपल्या आणि आपल्या पुढील पिढ्यांचे आयुष्य लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सुरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आशा भोसले यांनी अनेक संघर्षाचे प्रसंग पचवत जीवनाचे ‘आनंदगाणे’ केले. लता दीदी आणि आशा ताईंच्या नावाने उभे राहणारे हे रुग्णालय हजारो कुटुंबांना आधार देणारे ठरेल. या रुग्णालयात एक मजला संगीतोपचारांसाठी असावा.’
आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. केळकर यांनी प्रास्ताविकात रुग्णालयाविषयी माहिती दिली. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले. कोनशिला अनावरण समारंभापूर्वी सांगीतिक मैफिलीतून आशा भोसले यांनी स्वरांजली वाहण्यात आली.
‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे मनोगत मिलिंद कुलकर्णी यांनी वाचून दाखवले. ‘माझे गाणे, माझ्या चाली, माझी अभिव्यक्ती म्हणजे बाबांचे स्वरनक्षत्रांचे देणे, दीदीचे निरामय गाणे आणि आशाताईचे विविधरंगी तराणे! आज हे माझ्यापाशी नाहीत. ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने’!’, अशी भावना त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.
फडणवीसांना दिल्लीत जाण्याच्या शुभेच्छा
‘‘मंगेशकर रुग्णालयाच्या कार्यक्रमासाठी अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा विरोधी पक्षनेते म्हणून आले आणि पुढच्या वेळी पंतप्रधान म्हणून आले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आले आणि पुढच्या वेळी येतील तेव्हा त्यांनी पंतप्रधान म्हणून सलग तिसरा कार्यकाळ पूर्ण केला असेल. आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या बाबतीतही असेच घडो आणि त्यांच्या रूपाने महाराष्ट्राचे नाव दिल्लीत जावो’, असे म्हणत डॉ. धनंजय केळकर यांनी सूचकपणे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
‘नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत मी देखील प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या कार्यक्रमाला आलो होतो. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री झालो. त्यामुळे हा आशीर्वाद मला यापूर्वीच मिळाला आहे. आता शिल्लक काही नाही’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.