Yashomati Thakur: अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींवर SIT मार्फत कारवाई करा, यशोमती ठाकूरांची मागणी
esakal April 17, 2026 02:45 AM

अचलपूर (परतवाडा) येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधमांवर आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. आज आमदारभाई जगताप, खासदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) व आयजी (अमरावती रेंज) यांची भेट घेतली.

यावेळी या गंभीर प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे (SIT) करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, शहराध्यक्ष बबलूभाऊशेखावत, नगरसेवक अनिलभाऊ अग्रवाल यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Baramati by election: हाके कोणत्या पक्षाकडून लढवणार बारामतीची पोटनिवडणूक?

"अचलपूरमधील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. केवळ मुख्य आरोपीच नाही, तर या गुन्ह्यात त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिला. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोषींवर तात्काळ कठोर पावले उचलण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.