तलावांच्या जिल्ह्यात पाण्याचं भीषण संकट; भंडाऱ्यातील चुलबंद नदीचं पात्र कोरडंठाक, जळगावमध्ये उष्णतेची लाटेचा केळी पिकांना फटका
प्रशांत देसाई April 17, 2026 09:43 AM

Bhandara News : राज्यभरात सूर्य आग ओकत असून पाण्याची भीषणतेनंही आता डोकं वर काढले आहे. जलसाठ्यामध्ये कमालीची घाट झाली आहे. अशातच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अनेक उपनद्या आणि नाले कोरडे पडले आहेत. लाखनी तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीचं (Chulbandand River) पात्र कोरडं पडलं असून, उन्हाळी भातपिकांसह बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः जमिनीच्या काळजातून पाणी शोधत आहेत.

Bhandara Water Crisis : 'चुलबंद' नदी आज एखाद्या वाळवंटासारखी

भंडारा जिल्हा असा जिल्हा आहे जिथं पाण्याचा कधी तुटवडा भासणार नाही, असं वाटायचं, तिथेचं आज उष्णतेच्या लाटेनं शेतकरी हवालदिल झालाय. लाखनी तालुक्यातील पालांदूर ते दिघोरी या मार्गावरील प्रमुख 'चुलबंद' नदी आज एखाद्या वाळवंटासारखी भासत आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह तर सोडाच, पण ओलावाही आता शिल्लक राहिलेला नाही. नदी कोरडी पडली असली तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी मात्र आटलेले नाही. हाताशी आलेल्या उन्हाळी भात पिकाला आणि पालेभाज्यांना वाचवण्यासाठी शेतकरी जीवाचं रान करत आहेत.

Bhandara News: नदीपात्रात तब्बल 20 ते 25 फूट खोल खड्डे खोदून त्यावर मोटारपंप

भंडाऱ्यातील ही दृश्यं केवळ एका जिल्ह्याची नसून, वाढत्या तापमानाचा आणि जलसंकटाचा हा धोक्याचा इशारा आहे. आपल्या पिकांना वाचवण्यासाठी चुलबंदच्या पात्रात खड्डे खाणाऱ्या या बळीराजावरील ही जलसंकट भविष्यात टळणार का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. शेतातील उभं पिकं कडक उन्हात करपू नये, यासाठी नदीपात्रात तब्बल 20 ते 25 फूट खोल खड्डे खोदून त्यावर मोटारपंप लावून भूगर्भातील पाणी ओढल्या जातं आहे. अवघ्या २०० मीटरच्या परिसरात ५० हून अधिक मोटरपंप बसवून पाणी खेचण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. कडाक्याचं ऊन आणि दुसरीकडे जमिनीखाली खोलवर गेलेली पाण्याची पातळी, यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

 Jalgaon: जळगावमध्ये उष्णतेची लाटेचा केळी पिकांना फटका

दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरल्याने त्याचा फटका हजारो हेक्टर क्षेत्रातील केळी बागांना बसला असून अनेक ठिकाणी केळी बागा सुकू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनसाठी जसा प्रसिद्ध आहे तसाच तो उष्णतेच्या बाबतही प्रसिद्ध आहे. सध्या जळगावमध्ये उष्णतेची लाट पसरली असून तापमान 43 अंशवर जाऊन पोहोचल्याने त्याचा परिणाम जसा जनजीवन विस्कळीत होण्यावर होत आहे, तसाच तो केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वर ही होताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात एकूण सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होत असताना, एकाच आठवड्यात उष्णतेच्या लाटेने हजारो हेक्टर क्षेत्रातील केळी बागांनचे नुकसान झाल्याने, पुन्हा एकदा केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे संकट उभे राहिले आहे. सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.