आदूबाळ : (झटकन आयफोन उचलून स्पीड डायल करत) हाय देअर...!
अमूबाळ : (आयफोन उचलून फोन रिसीव करत) जय महाराष्ट्र, आदूदादा!
आदूबाळ : (सहजतेनं) हौ आर्यु?
अमूबाळ : (विनम्रतेनं) मस्त! आत्ताच वडा खाल्ला...आय मीन वडे खाल्ले! तीन!!
आदूबाळ : वॉव! मी आंबे खाल्ले!! तीन!!
अमूबाळ : (अवघडून) आम्ही अक्षयतृतीयेला खातो आंबे!! बाबा म्हणाले, हात लावायचा नाही, अजून पिकले नाहीत!
आदूबाळ : (थोरल्या दादाच्या आविर्भावात) तुला कळलं का? मी कार्याध्यक्ष होतोय!
अमूबाळ : (थक्क होत) डोण्ट टेल्मी हं! खरंच?
आदूबाळ : (विजयी मुद्रेनं) अफकोर्स!
अमूबाळ : मग आता संजयकाकांचं काय होणार?
आदूबाळ : (दुर्लक्ष करत) बॅब्स म्हणाले की इतिहासाची पुनरावृत्ती करायचीय! मीसुद्धा आधी कार्याध्यक्षच होतो, आता तू होशील!! मी इतिहास घडवला, तूदेखील घडवशील!!
अमूबाळ : (निरागसपणाने) तुझे बाबा, आय मीन माझे काका, रिटायर होणार?
आदूबाळ : वेल, ऑलमोस्ट! पण इट्स कॉम्प्लिकेटेड! कळेल तुला हळू हळू! पॉलिटिक्समध्ये टोटल रिटायरमेंट कधीच नसते!
अमूबाळ : (सुस्कारा सोडत) गायडन्ससाठी कुणीतरी मोठं माणूस हवंच ना?
आदूबाळ : (भविष्याकडे नजर लावून) मी प्रत्यक्ष काम करीन, आणि बॅब्स, आय मीन तुझे काका, घरात बसून मला सल्ला देतील!
अमूबाळ : (निरागसपणाची कमाल...) आधीही ते घरात बसूनच काम करायचे ना?
आदूबाळ : (गडबडून) ते वेगळं, आणि हे वेगळं!!
अमूबाळ : (हेवा वाटून) कसं घडलं हे?
आदूबाळ : (घरगुती माहिती देत) परवा असेच साबुदाणेवडे खात होतो...मी म्हणालो, टॉप झाले आहेत! तर बॅब्स म्हणाले की, ‘‘किती दिवस असे साबुदाणे वडे खाणार आहेस? कामाला लागायला नको का? आता तुम्ही मोठे झालात, जबाबदारी घ्यायला कधी शिकणार? कधी एकदा तू पक्षाची सूत्रं हातात घेतोयस, आणि मी मोकळा होतोय, असं झालंय मला! येत्या १९ जूनला मी तुला कार्याध्यक्ष करून टाकून मोकळा होणाराय! मग तुम्ही आणि तुमचा पक्ष...
अमूबाळ : (आश्चर्यानं थक्क होत) ओह गॉड! असं घडलं? मला हे बाबांना सांगायला हवं! काहीही म्हण, आदूदादा! तुझं हार्दिक अभिनंदन! मला तुझा खूप अभिमान आहे, आदूदादा!! तू खूप मोठा होशील!!
आदूबाळ : (शुभेच्छा स्वीकारत) थँक्स ब्रो! आय नीड युअर कोऑपरेशन! आपण दोघे मिळून इतिहास घडवू! महाराष्ट्राचं भलं करू!!
अमूबाळ : (छाती ताणत) पिंकी प्रॉमिस!! आपणच महाराष्ट्राचं भवितव्य आहोत! भविष्यातले तारणहार आहोत!! हो ना?
आदूबाळ : (सावध होत) सध्या तरी मीच एकटा महाराष्ट्राचं भविष्य आहे! तू तुझ्या बाबांना, आय मीन माझ्या काकांना विचार!
अमूबाळ :काय विचारू आदूदादा?
आदूबाळ : (डोळे बारीक करून) हेच की तुम्ही कधी रिटायर होणार आहात?
अमूबाळ : (दचकून) नको!
आदूबाळ : (धूर्तपणाने) का? विचार की!! त्यात कशाला घाबरायचं?
अमूबाळ : (नुसत्या कल्पनेनं) हाणतील खूप!! नको!!
आदूबाळ : (चिथावणी देत) ठणकावून विचार! म्हणावं की महाराष्ट्र जानना चाहता हय की तुम कभी रिटायर होनेवाले हो!!
अमूबाळ : (शहारुन) असं हिंदीत विचारू? मग तर कांडातच निघेल!!
आदूबाळ : (संयमी पवित्रा घेत) उतावळा होऊ नकोस! मी मोठा होतोय, एक दिवस तूसुद्धा होशील! महाराष्ट्राला चॉईस तरी कुठे आहे? हाहा!! जय महाराष्ट्र!