300 किलो RDX पैकी 100 किलो वापरलं, उर्वरित 200 किलो गेलं कुठे? मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतरची थरारक सत्यस्थिती मांडणारा 'मिशन मुंबई'
Tv9 Marathi April 17, 2026 01:45 PM

मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या त्या काळ्या दिवसांनंतरची थरारक सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणारा एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. आरडीएक्सचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी केलेली जीवघेणी मोहीम आणि त्यामागचा संघर्ष या पोस्टरमधून प्रकर्षाने दिसून येत आहे. पोस्टरमध्ये एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील कलाकाराचा आक्रमक अंदाज पाहायला मिळत असून चित्रपटातील ॲक्शन आणि गांभीर्याची साक्ष देत आहे. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी 300 किलो आरडीएक्सपैकी 100 किलो आरडीएक्स वापरलं गेलं, तर 200 किलो आरडीएक्स गेलं कुठे?, याचा शोध ‘मुंबई मिशन’मधून उलगडणार आहे. सत्य घटनेवर प्रेरित होऊन हा काल्पनिक चित्रपट बनविण्यात आला आहे.

‘रेविकांता फिल्म्स निर्मित’ आणि ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत, बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘मिशन मुंबई’चं अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यावेळच्या भीषण आरडीएक्स (RDX) शोध मोहिमेवर प्रेरित असलेलं हे थरारनाट्य येत्या 15 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेते अजॉय शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.

‘मिशन मुंबई’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती सौ. कांता शर्मा यांनी सांभाळली आहे. तर चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी दिग्दर्शन केलं आहे. ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत हा चित्रपट आहे. तर चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी लेखक चंद्रकांत विसपुते यांनी सांभाळली आहे. तसंच संगीत समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात, विकी वाघ यांचं आहे. चित्रपटातील गाण्यांना गायक सुदेश भोसले, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी साईराम, विकी वाघ, दिशा सुतार यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर गीतकार म्हणून कृपेश, विकी, राजीव, बिपीन यांनी बाजू हाताळली. तसेच कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यांनी बाजू पाहिली आहे.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते म्हणाले, “मुंबईच्या इतिहासातील तो काळ आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. सत्य घटनेवर प्रेरित होऊन ‘मिशन मुंबई’ च्या माध्यमातून आम्ही त्या शोध मोहिमेतील धाडस आणि पोलीस दलाचं योगदान काल्पनिकदृष्ट्या पडद्यावर मांडत आहोत.”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.