Pune News : सिंहगडावर मित्रासंगे ट्रेकिंगला गेले, वाटेत आलेल्या Heart Attack पर्यटकाचा मृत्यू
Tv9 Marathi April 18, 2026 01:45 AM

सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना एका 55 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरेश रघुनाथ भोकरे हे आपल्या मित्रांसह सिंहगड फिरायला गेले होते. सकाळी पाचच्या सुमारास त्यांनी पायवाटेने गड चढायला सुरुवात केली. गड चढत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने स्ट्रेचरवरुन गडाच्या पायथ्याशी आणून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.

सुरेश भोकरे हे त्यांचा मित्रांसह सिंहगडावर आले होते. पहाटे ५ वाजता ते आपल्या मित्रासह गडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत पोहोचले.. सव्वा पाचच्या सुमारास त्यांनी पायवाटेने गड चढण्यास सुरुवात केली. गड चढत असताना पढेर मेटावरील मारुती मंदिराजवळ पोहोचल्यानंतर सर्वजण काही वेळ विश्रांतीसाठी थांबले. त्यानंतर पुन्हा चालू लागताच भोकरे यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने स्ट्रेचरवरून गडाच्या पायथ्याशी आणून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सुरेश रघुनाथ भोकरे हे कात्रज येथील गोकुळनगरात राहायला होते. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भर दुपारी उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये

सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बळीराम वायकर,नितीन गोळे,उत्तम खामकर आणि संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचे कार्य केले. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. तीव्र उन्हामुळे आणि शारीरिक श्रमामुळे वृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी डोंगर चढणे टाळावे असे आवाहन सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी केले आहे. तीव्र उन्हामुळे शरीरात पुरेसे पाणी नसल्यास ड्रीहायड्रेशन होण्याचा धोका असतो. त्यामुळे वयस्क व्यक्तीने भर दुपारी उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये असेही आवाहन करण्यात येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.