योगिराज महाराज पैठणकर
सद्यःस्थितीत माणसाचं सरासरी आयुष्य हे सहा तपांचं- म्हणजे ७२ वर्षांचं आहे, असं काही निरीक्षणांवरून लक्षात येतं. तसं संतांनी ते १०० वर्षे सांगितलं असलं तरी विविध आजार व व्याधींमुळे माणूस तिथपर्यंत सहसा जगत नाही. सुरुवातीची बारा वर्षं म्हणजे एक तप खेळण्याबागडण्यात- म्हणजेच बालपणात निघून जातं. पुढील दोन तपांत आपल्याला तीन अवस्थांचा अनुभव घ्यायचा असतो- त्या म्हणजे किशोरावस्था, तारुण्यावस्था व प्रौढावस्था होय. किशोरावस्था १३ ते १८, तारुण्यावस्था १९ ते ३० आणि त्यापुढे वयोवृद्ध होईपर्यंत प्रौढावस्था. श्री एकनाथ महाराज म्हणतात,
बाळत्व तारुण्य वृद्धत्व। ऐसे देहाचे विविधत्व।।
या तीन अवस्थांव्यतिरिक्त त्यांनी ग्रंथकौस्तुभ श्रीएकनाथी भागवताच्या बाविसाव्या अध्यायात देहासंबंधी नऊ अवस्थांचे वर्णन केले आहे, ते मुळातून पाहणे इष्ट ठरेल.
तारुण्याचा काळ आपल्या भविष्याची दिशा व दशा ठरवत असतो. स्वउन्नतीसह समाजाच्या कल्याणाचा विचार जरूर व्हावा, मात्र याची लक्ष्मणरेषा आपण आखून घ्यायला हवी. या कालखंडात मनुष्य स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो, प्रगती करू शकतो. दुर्व्यसने, इंटरनेट, गेमिंग, सोशल मीडिया, सेल्फी आदींचे व्यसन, अधीनता समाजात झपाट्याने वाढत आहे हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. तरुणाई यात अडकून पडली आहे. कुसंगतीने जीवन भरकटत आहे. श्री एकनाथ महाराज म्हणतात,
तरुण अवस्था विषयाचे ध्यान। न ये ते भजन मुखी सदा।।
तरुणपणात विषयासक्तीने ना भगवंताकडे, ना त्याच्या भजनाकडे लक्ष दिले जाते. एक गोष्ट येथे लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे आपले जवळपास सर्वच संत तारुण्याच्या आतच संतत्व प्राप्तकर्ते झाले आहेत. युवकांनी संतांचे, महापुरुषांचे चरित्र जाणून घेणे गरजेचे आहे. त्याद्वारे प्राप्त होणारी प्रेरणा दिशादर्शक आहे. चारशे वर्षांनंतरही एकनाथ महाराजांचे तत्त्वज्ञान, त्यांनी केलेले समाजाचे विवरण जसेच्या तसे पाहावयास मिळत आहे. त्यांच्या लिखाणाचे त्रिकालाबाधित्व सिद्ध होत आहे. ते म्हणतात,
या उपरी तरुणपण। इंद्रिय सामर्थ्य संपूर्ण।
मी शहाणा मी सज्ञान। देही देहाभिमान मुसमुशी।।
तेथ स्त्रीकाम आवडे चिन्ती। धनकामाची अतिप्रीती।
देहगेहांची आसक्ती। नामरूपांची ख्याती लौकिकी मिरवी।।
आजचा तरुणही याच सर्व विवंचनेत अडकला आहे. जबाबदारीचे ओझे घेऊन वणवण भटकत आहे. अर्थात, कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्याने कष्ट करणं गरजेचं आहे. हे करताना मात्र त्याने चिंतन आणि चारित्र्य याचा कायम विचार करावयास हवा. कारण भगवतचिंतन हे पारलौकिक आयुष्यासाठी आणि चारित्र्यसंपन्नता ही लौकिक आयुष्याची शिदोरी आहे. दोन्ही गोष्टी आपला देह नष्ट झाल्यानंतरही शिल्लक राहणाऱ्या आहेत. यासाठी आपल्याला गरज आहे अशा एका मार्गदर्शकाची, जो आपल्याला पथभ्रष्ट होऊ देणार नाही आणि तो मार्गदर्शक दुसरा तिसरा कोणी नसून ते सद्गुरू आहेत. श्री एकनाथ महाराज म्हणतात,
मस्त होऊ नका तारुण्याच्या भरे। करावी या करे सद्गुरू सेवा।।
व्यावहारिक जगतात युवकांकडे चिंतन, चारित्र्य, चपलता आणि चातुर्य हे चार गुण असतील तर जगातील कोणतीही गोष्ट त्यांना मागे खेचू शकत नाही. म्हणून संत सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवन व्यतीत करणारा तरुण तरून जाईल यात शंका नाही.