डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ
आपण सगळे रोजचं आयुष्य जगतो. असंख्य जबाबदाऱ्या पार पाडतो. फावल्या वेळेचा सदुपयोग करायचाही प्रयत्न करतो... पण ‘मी जिवंत आहे’- बोलीभाषेत ‘अलाइव्ह आहे!’ ही भावना किती वेळा जाणवते?...
‘‘डॉक्टर... माझं आयुष्य चुकीचं नाही. पण बरोबरही वाटत नाही!’’ माझ्यासमोर बसलेली ‘ती’ शांत होती. डोळ्यांत पाणी नव्हतं, पण न बोललेला थकवा होता.
‘‘सगळं आहे; पण मी नाहीये त्यात.’’
मी हळूच विचारलं, ‘‘तू शेवटचं स्वतःसाठी काही केलंस ते कधी गं? ज्यात ‘परिणाम’ नव्हता, फक्त करणं होतं?’’
ती थांबली आणि म्हणाली, ‘‘माहीत नाही. खूप वर्षं झाली.’’
आणि मग तीच वाक्यं- ‘आता या वयात कुठे...’, ‘ते दिवस गेले’, ‘ज्या वयात करायचं होतं, तेव्हा नाही करता आलं...’, ‘आता कुठे झेंडे फडकवायचे आहेत?’, ‘सुरू केलं की काही तरी होतंच; मग कशाला परत?’
‘जगणं’ कधी विसरलं?...
ही फक्त तिची वाक्यं नव्हती, आपल्या सगळ्यांची ही सवय आहे. मी तिला विचारलं, ‘‘ही वाक्यं खरीच आहेत... की वारंवार ऐकून खरी वाटायला लागली?’’
आपल्यात जन्मतः एक ओढ असते- ‘काहीतरी बनण्याची’ नाही; तर जे आहोत ते पूर्णपणे जगण्याची. लहानपणी आपण ते सहज करत असतो- चित्रं रंगवतो, गाणी म्हणतो, पडतो-धडपडतो, पुन्हा उठतो. मोठं होताना मात्र आपण शिकतो- ‘यातून काही मिळत नाही...’, ‘हे उपयोगाचं नाही’, ‘लोक काय म्हणतील?’... आणि मग आपण जगत नाही, तर फक्त आयुष्य ‘निभावतो’.
बाहेर सगळं ठीक. आत पोकळी. कारण आपण क्षमतेला जागा देत नाही. ‘जिवंत आहोत’ असं ज्यातून वाटतं, त्या गोष्टी पुढे ढकलतो. आपली क्षमता बीजासारखी असते, वेळेच्या मातीत रुजवली, प्रयत्नांच्या खतपाण्यानं वाढवली तरच ती बहरते आणि समाधानाची सावली देते. अशा क्षमता प्रत्येकात आहेत पण त्या शोधाव्या लागतील. बऱ्याच गोष्टी करून पाहिल्यावर त्या सापडतील. बीजाला कुठे माहीत असतं की त्यात झाड होण्याची क्षमता आहे!
नंतर मी तिला विचारलं, ‘‘तुला काय आवडायचं?’’
‘‘पूर्वी मी नाचात खूप छान होते.’’
‘‘आणि आता?’’
ती हसली, ‘‘आता या वयात कुठे!...’’
मी शांतपणे विचारलं, ‘‘वय थांबवतंय की तू स्वतःला थांबवतेयस?’’
त्या शांततेत काहीतरी हललं.
आपण वाट पाहतो- योग्य वेळ, परिस्थिती, संधी; पण खरं असं आहे, की आधी कृती, मग अर्थ. पूर्णपणे केलं की अर्थ तयार होतो.
काही दिवसांनी ती पुन्हा आली- ‘‘मी कथकचा क्लास सुरू केला- आठवड्यातून तीन वेळा.’’
‘‘कसं वाटतंय मग?’’
ती हसली, ‘‘मी जेव्हा नाचते, तेव्हा काही सिद्ध करायचं नसतं. कुणाला दाखवायचं नसतं. फक्त... मी असते!’’
‘परिपूर्ण’तेचा अट्टहास नाही!
ना प्रदर्शन. ना कौतुक. ना परिणाम. फक्त प्रक्रियेचा आनंद. खरं तर काही मोठं घडलं नाही. पण एक मोठी गोष्ट घडली- ती स्वतःच्या आयुष्यात पुन्हा दिसायला लागली.
आपण सगळेच असे काही तरी पुढे ढकलतो, ‘बकेट लिस्ट’ भरून जाते. ‘वेळ मिळाला की...’, ‘जबाबदाऱ्या कमी झाल्या की...’, ‘योग्य वेळ आली की...’ पण योग्य वेळ येत नाही, ती निवडावी लागते.
अडथळे येणारच. थांबणंही होणार. प्रश्न थांबण्याचा नाही, तर त्याला पूर्णविराम न समजता स्वल्पविराम समजून परत सुरू करण्याचा आहे. स्वतःला भेटणं ही ‘मॅरॅथॉन’ नाही, ‘स्प्रिंट’ही नाही, ती ‘हर्डल रेस’ असू शकते. प्रत्येक टप्प्यावर आपण स्वतःचे अडथळे ओलांडतो. आणखी एक सापळा- ‘मला परिपूर्ण व्हायलाच हवं.’ या नादात आपण सुरूच करत नाही किंवा थांबतो. म्हणून उत्तर साधं- ‘परिपूर्ण’ नाही, पण ‘पूर्णपणे’! इथे पूर्णपणे म्हणजे- स्वतःला विसरून करणं, परिणाम सोडून गुंतणं. थांबलात तरी दोष न देता पुन्हा सुरू करणं.
महत्त्वाचा मुद्दा हा, की ही ‘उरलेल्या वेळात’ करायची गोष्ट नाही. ही स्वतःसाठी वेळ काढून, आपल्या आत डोकावून केलेली निवड आहे. इथे ‘छंद जोपास’ असा सल्ला नाहीये, तर ‘स्वतःला शोध’ असा सूचक इशारा आहे. आयुष्याचा पेपर सोडवताना आवडीचा प्रश्न मागे पडतो आणि आपण गोंधळतो. असं काहीही जिथे तुम्ही तल्लीन होता, ‘तुम्ही’ विरघळता आणि फक्त अनुभव उरतो. तो छंद नाही, ती तुमची निवड आहे.
नामस्मरण, बागकाम, व्यायाम, चित्रकला, गाणं, वाचन, जिथे ‘मी’ कमी होतो आणि फक्त ‘असणं’ उरतं. तिथेच तुम्ही स्वतःला सापडता.
अशा कृती मनाला शांतता, स्थिरता देतात आणि स्वतःला स्वतःशी पुन्हा जोडतात. हा मानसिक आरोग्यासाठीचा उपचार नाही, पण टॉनिक मात्र नक्कीच आहे.
माझी एक मैत्रीण- उत्तम डॉक्टर. दरवर्षी गणपतीत ती एक सुंदर दृक-श्राव्य कलाकृती उभी करते- लेखन, दिग्दर्शन, सराव सगळं. त्याची सुरुवात मुलांसाठी झाली. मुलं मोठी झाली, दूर गेली. पण ती थांबली नाही. आज ती आम्हाला म्हणते, ‘‘तुला जे जमतं ते घेऊन सहभागी हो.’’ आणि एक सुंदर सादरीकरण घडतं. कशासाठी? ना स्पर्धा, ना पुरस्कार, ना प्रसिद्धी! वर्षातून एकदा स्वतःला भेटण्यासाठी आणि एकमेकांना स्वतःशी भेटवण्यासाठी. त्या दिवसांत आम्ही आमच्या भूमिका विसरतो- डॉक्टर, आई, कर्मचारी... आणि पुन्हा फक्त स्वतः होतो. चुका होतात, वेळ जुळत नाही. तरीही चालू राहतं, कारण इथे ‘परफेक्ट’ नाही, पूर्णपणे ‘स्व-भागी’ व्हायचं असतं.
आपण कामामुळे थकत नाही, आपण स्वतःपासून दूर गेल्यामुळे थकतो. मानसिक आरोग्य म्हणजे फक्त ताण कमी करणं नाही, ते आहे स्वतःशी जोडलेलं राहणं. तर, आज एकच प्रश्न- ‘मी खरंच जगते/ जगतो आहे का?... की फक्त निभावते/ निभावतो आहे?’