Pune News: 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' कागदावरच!; सोसायट्यांकडून देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, महापालिकेचेही ठोस प्रयत्न नाहीत
esakal April 18, 2026 01:45 PM

पुणे: शहराच्या काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर झालेली असताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणेकडे सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. मिळकत करामध्ये सवलत घेण्यापलीकडे या यंत्रणेचा प्रत्यक्षात भूजल पातळी वाढविण्यासाठी वापर होत नाही. विशेषतः महापालिकेकडूनही सोसायट्यांकडील ही यंत्रणा कायमस्वरूपी कार्यरत असावी, यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत.

एकीकडे शहरातील समाविष्ट गावे व उपनगरांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली. महापालिकेकडे पाण्याची मागणीही वाढत आहे. तर दुसरीकडे भूजल पातळीमध्ये वाढ करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे मात्र गांभीर्याने पाहिले जात नसल्याची सद्यःस्थिती आहे.

२००६ नंतरच्या बांधकाम प्रकल्पांना ही यंत्रणा बंधनकारक केली आहे. त्याशिवाय महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून संबंधित नवीन बांधकाम प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला दिला जात नाही. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा विघटन प्रकल्प व सौर पॅनल प्रकल्प असणाऱ्या सोसायट्यांमधील सभासदांना मिळकत करामध्ये पाच टक्के सवलतही मिळते.

Pune News: चार तालुक्यांना टँकरने पाणीपुरवठा; पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

महापालिकेचा बांधकाम विभाग बांधकाम व्यावसायिकास पूर्णत्वाचा दाखला देताना त्यांच्याकडील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची तपासणी करून घेते. त्यानंतर व्यावसायिकाकडून सोसायटी हस्तांतरित झाल्यानंतर काही सोसायट्यांकडून या यंत्रणेकडे नियमित लक्ष देऊन, देखभाल-दुरुस्ती करून कूपनलिकेचे पुर्नभरण करून भूजल पातळी वाढविण्याचे काम केले जाते.

त्यामुळे संबंधित सोसायट्यांना काही महिने पाण्याची टंचाई भासत नाही. मात्र काही सोसायट्यांकडून या यंत्रणेला गांभीर्याने राबविण्याऐवजी वर्षभर टॅंकरमधून पाणी घेण्यास प्राधान्य दिले जाते. या यंत्रणेचा फिल्टर बदलण्याचेही काम केले जात नाही. त्याची पाहणी करण्याचे कष्ट महापालिकाही घेत नाही.

तरीही घेतला जातोय कराच्या सवलतीचा लाभ...

मिळकत करामध्ये पाच टक्के सवलत मिळविण्यासाठी हजारो सोसायट्या हा प्रकल्प सुस्थितीत असल्याचे भासवतात. एकदा सवलत लागू झाली की, त्यानंतर प्रकल्प सुरू आहे की बंद, याची शहानिशा कोणताही विभाग करत नाही. या ठिकाणीही सोलर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग व कचरा विघटन प्रकल्पाबाबत संबंधित विभागाकडून मिळकतकर विभागास माहिती दिली जाते. त्यानंतर सर्वसाधारण करावर ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. प्रत्यक्षात ही माहिती फक्त प्रकल्प नव्याने सुरू झाल्यानंतर मिळकतकर विभागास दिली जाते, त्यानंतर त्याची पाहणीही होत नाही.

रेन वॉटर हार्वेस्टिंग सद्यःस्थिती...
  • २०२५-२६ मध्ये प्रकल्प असणाऱ्या सोसायट्या - ७६६

  • प्रकल्पासाठी मिळकत कराचे लाभार्थी - ४ हजार ८११

Vidhan Parishad Election : मविआकडून पुन्हा ठाकरेंना संधीची शक्यता, तर शिंदे सेनेत २ जागांसाठी ६ नावं चर्चेत

"बांधकाम प्रकल्पासाठी पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची तपासणी केली जाते. मनुष्यबळाच्या अभावामुळे संबंधित प्रकल्पांची नियमितपणे तपासणी करण्यास अडचण येते. सोसायट्यांनी स्वतः आपल्या प्रकल्पांची देखभाल-दुरुस्ती केली पाहिजे. तरीही, यासंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला जाईल."

- प्रवीण शेंडे, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.